भूतबाधा झाल्याचे सांगत अडीच वर्षांच्या मुलावर अत्याचार, चटके, मारहाण; भांडुपमध्ये दाम्पत्याचे अघोरी कृत्य

भांडुपमध्ये एका दांपत्याने मोलकरणीच्या अडीच वर्षांच्या मुलाला भुतबाधा झाल्याचे सांगत त्याला चटके देत काठीने मारहाण केली. याविरोधात मातेने तक्रार केल्यानंतर भांडुप पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत त्या माथेफिरू दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. भांडुप पश्चिमेकडील लोकमान्य नगरात ती 31 वर्षीय महिला तिचा पती व अडीच वर्षांच्या मुलांसोबत राहते. ती विवाहिता व्यावसायिक वैभव कोकरे यांच्याकडे घराकामाला जात होती. पतीला अर्धांगवायूचा झटका आल्याने ती मुलाला कामाच्या ठिकाणी घेऊन जायची. तेव्हा त्याने हर्षदा गुरव हिला त्याची पत्नी असल्याची ओळख करून दिली होती.

दरम्यान, माझ्यात दैवी शक्ती असून मला एक निरोप आलाय. त्यानुसार तुझ्या मुलाला भूतबाधा झाली आहे. त्याच्यावर उपचार करावे लागतील, असेही वैभवने तिला सांगितले. वैभव खरं बोलत असावा असे तिला वाटलं. 24 तारखेला वैभव आणि हर्षदाने अघोरी कृत्य करण्यास सुरुवात केली. तिने मुलाला आपल्या पायात पकडून त्याचे केस उपटू लागली आणि अंगातून निघून जा असे ओरडू लागली. त्यानंतर माचिसच्या काड्या पेटवून मुलाच्या अंगावर चटके दिले. मुलगा रडू लागल्याने वैभवने काठी आणि झाडूने त्याला मारहाण केली.

अखेर घडला प्रकार मातेने नातेवाईकांना सांगितल्यानंतर भांडुप पोलिस घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणी पोलिसांनी वैभव व हर्षदा यांच्या विरोधात फसवणूक, मारहाण, अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.