
अहमदाबाद येथील घटस्फोटाचे प्रकरण चर्चेत आले आहे. स्वयंपाकात लसूण आणि कांदा वापरण्यावरून जोडप्यातील वाद विकोपाला गेला व 11 वर्षांनंतर हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले. पत्नी मुलांना घेऊन घराबाहेर पडली. पत्नीच्या खाण्यापिण्याच्या निर्बंधामुळे त्रस्त नवऱ्याने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला आणि तो मंजूरही झाला.
संबंधित जोडप्याचे लग्न 2002 साली झाले होते. पत्नी स्वामीनारायण संप्रदायाची अनुयायी आहे. त्यामुळे तिने कांदा, लसूण वर्ज्य केले होते. मात्र तिचा नवरा आणि सासू कांदा, लसूण खाणारे होते. कालांतराने त्यांच्या खाण्याच्या सवयी कौटुंबिक कलहाला कारणीभूत ठरल्या. त्यांच्या नात्यात कटुता आली. पत्नी नित्यनियमाने प्रार्थना उपवास करायची. तिने स्वतःची वेगळी चूल केली.
अखेर प्रकरण काडीमोडापर्यंत गेले. 2024 मध्ये फॅमिली कोर्टाने विभक्त होण्यास मंजुरी दिली. मात्र त्याच वेळी पत्नीला पोटगी देण्यास सांगितले. मात्र याचे पालन होत नसल्याने प्रकरण हायकोर्टात गेले आहे. त्यावर सुनावणी होऊन पतीने पोटगीची रक्कम हप्त्याने न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्यास तयारी दर्शवली आहे. यानंतर हायकोर्टाने पत्नीची घटस्फोटाला आव्हान देणारी याचिका रद्द केली आहे.



























































