घरातून पळून जाऊन लग्न केलं, वधुपक्षाने नवऱ्या मुलाचं गुप्तांग छाटलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
murder-knife

घरातून पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून वधुपक्षाने नवऱ्या मुलाचं गुप्तांग छाटल्याची भयंकर घटना नवी दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेतील पीडित सूरज (बदललेलं नाव) याचे सागरपूर येथे राहणाऱ्या रोशनी (बदललेलं नाव) हिच्याशी प्रेमसंबंध होते. ते काही दिवसांपूर्वी घरातून पळून गेले आणि त्यांनी लग्न केलं. पण, लग्नानंतर त्यांना आपल्या जीविताला धोका असल्याची भीती सतावू लागली.

त्यामुळे ते दोघंही बुधवारी सायंकाळी पाच वजता राजौरी गार्डन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली. तिथून बाहेर निघाल्यानंतर त्यांच्या पाळतीवर असलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांचं अपहरण केलं. सूरज याच्या आरोपानुसार, रोशनीच्या कुटुंबाने त्यांना पळवून सागरपूर येथे नेलं. तिथे त्यांनी सूरजला बेदम मारहाण केली आणि त्याचं गुप्तांग कापलं.

रक्तबंबाळ अवस्थेतल्या सूरजला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलिसांनीच रोशनीच्या कुटुंबीयांना त्यांची माहिती दिल्याचा आरोप सूरजच्या कुटुंबाने केला आहे. तर, पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. रोशनीचे कुटुंबीय त्यांच्या पाळतीवर होते, त्यामुळे त्यांनी वेळ साधून त्यांचं अपहरण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.