
>> अनिल साखरे
एकूणच देशभर कोरोना विषाणूविरुद्ध चाललेल्या लढाईत सरकार, विरोधी पक्ष आणि देशभरातील जनतेने एक गोष्ट लक्षात घेणे जरुरीचे आहे की, या कोरोनानामे मानवनिर्मित आणि अनैसर्गिक आपत्तीने सगळ्या जगालाच वेठीस धरले आहे. अगदी पहिल्या आणि दुसऱया महायुद्धात पण युद्ध करणारी राष्ट्रे सोडली तर जगातील इतर व्यापार-उदीम आणि मानवाच्या संचारावर ती मर्यादा आल्या नव्हत्या, पण या कोरोनानामक आपत्तीमुळे जगभरातच व्यापार-उदीम, वस्तूच्या आणि मानवाच्या संचारावरच मर्यादा आल्या आहेत. तेव्हा ही लढाई केवळ एका व्यक्तीची, पक्षाची, सरकारची नसून सरकार, प्रशासन, विरोधी पक्ष, विचारवंत आणि सर्वसामान्य नागरिक यांना मिळूनच लढावी लागणार आहे. विरोधी पक्षांनी सरकार करीत असलेल्या उपाययोजना केवळ विरोधासाठी विरोध करणं योग्य नाही.
सरकार चुकत असेल तर योग्य ती दिशा दाखवणे जरुरी आहे. सत्ता हातून गेल्यामुळे भाजप आणि त्याच्या भक्तगणांना जी काही विमनस्कता आली आहे त्याचा राग इथे काढणे बरोबर नाही. सरकारनेही यासंदर्भात तज्ञांची समिती गठन करताना विरोधी पक्षातील विचारवंतांनाही त्यामध्ये स्थान देऊन त्यांच्याही योग्य त्या सूचनांचा आदर करावा. आज देशभरातील एकूण लाखभर कोरोना संख्येमध्ये महाराष्ट्र जवळपास अर्ध्या संख्येने भर घालत असताना मुख्यमंत्र्यांनी काही कठोर निर्णय घेऊ नये अशी अपेक्षा करणे हे सर्वथा चुकीचे आहे.
शेवटी राजगादीचा निर्णय अधिकार अंतिम असतो आणि तो कुणाला आवडो किंवा न आवडो, सर्वांनाच मान्य करावा लागतो. यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाने घेतलेले नोटाबंदी आणि जीएसटीचे निर्णय देशातील जनतेच्या गळ्यात अटकले, पण मान्य केलेच ना! तेव्हा नक्की हा कोरोनाचा प्रसार कशामुळे इतका वाढत चालला आहे, यासाठीही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी योग्य तो अभ्यास करून कारणे शोधणे जरुरीचे आहे. कोरोनामध्ये नेमके काय जनुकीय बदल होत आहेत, त्यांची संभाव्य नवीन आवृत्ती आणि परिणाम काय असतील , सध्या चालू असलेल्या लसीकरणामुळे त्यावर योग्य प्रकारे मात करता येईल का या सर्वांचा अभ्यास होणे जरुरी आहे. शत्रूशी लढताना वयम् पंचाधिकं शतम् या सूत्रानुसार कोरोनाविरुद्धच्या लढाईत सरकार, विरोधी पक्ष, विचारवंत, सर्वसामान्य जनता यांनी एकजूट होऊन विजय मिळवणे जरुरी आहे.





























































