
कोरोनाविषयी असणारा गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी भाळवणी येथील शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर या कोविड सेंटरमध्ये उच्चशिक्षित दोन जोडप्यांनी कोरोना नियमांचे पालन करीत आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधल्या. निकेत व्यवहारे व आरती शिंदे आणि जनार्दन कदम व राजश्री काळे अशी या नवविवाहित दाम्पत्याची नावे आहेत.
भाळवणीतील आमदार नीलेश लंके यांनी उभारलेल्या या कोविड सेंटरमध्ये विवाह करण्याचा हट्ट या जोडप्यांनी आमदार लंके यांच्याकडे धरला. परंतु, त्यासाठी मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याच्या आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना आमदार लंके यांनी त्यांना दिल्या. यासाठी वधू-वरांसह उपस्थितांच्या कोरोना चाचण्या केल्या. विवाहस्थळाचे निर्जंतुकीकरण केले. त्यानंतर वधू-वरांसह वऱहाडींना विवाह मंडपात प्रवेश दिला. यावेळी अनेक रुढी-परंपरांना फाटा देत रुखवतामध्ये वधू-वरांनी कोविड उपचार केंद्राला भेट दिलेले जंतुनाशकाचे डबे, मास्क, पीपीई किट, औषधांची खोकी ठेवली. साधेपणाने विवाह सोहळा पार पाडल्याने वाचलेली रक्कम कोविड उपचार केंद्राला मदत म्हणून दिली.
आमदार लंके, ऍड. राहुल झावरे, बाबासाहेब तरटे, बाळासाहेब खिलारी, राजेंद्र चौधरी, अशोक घुले, श्रीकांत चौरे, डॉ. सुनील गंधे, बंडू कुलकर्णी, दत्ता कोरडे, प्रमोद गोडसे, सत्यम निमसे, देवराम व्यवहारे, सुदाम शिंदे, रामभाऊ रासकर, आदींसह शेकडो कोरोनाबाधित रुग्णांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात विवाह पार पाडला. यावेळी वऱहाडींसह कोरोना रुग्णांना सुग्रास जेवण दिले.

























































