कोरोना पुन्हा घसरला, रिकव्हरी रेट 93 टक्के, इन्फेक्शन रेट 1.22 टक्के

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत 20 हजारांवर गेलेली रुग्ण संख्या आता चांगली आटोक्यात आली असून रुग्ण संख्या सहा हजारांवर आली आहे. गेल्या 24 तासांत 5956 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 47 हजार 574 चाचण्यांमध्ये हे रुग्ण आढळले आहेत. यात 479 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यामधील 45 जणांना ऑक्सिजनची गरज लागली. तर एकाच दिवसात 14 हजार 551 जणांनी कोरोनावर मात केली. मात्र मृतांच्या आकडय़ात वाढ झाली असून एकाच दिवसात 12 जणांचा मृत्यू झाला. यामुळे मुंबईतील एकूण मृतांची संख्या आता 16469वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्क्यांवर गेला असून कोविड वाढीचा दर 1.22 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

एकूण बाधित दहा लाखांवर

मुंबईत सोमवारी 5956 रुग्ण आढळल्यामुळे गेल्या 20 महिन्यांतील एकूण रुग्णांचा आकडा 10 लाख 5 हजार 818वर गेला आहे. मात्र यातील 9 लाख 35 हजार 934 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या कोरोनामुक्त रुग्णांमुळे मुंबईत सद्यस्थितीत 50 हजार 757 सक्रिय रुग्ण आहेत.