
जगातील सर्व देश अजूनही कोरोनाशी लढत आहेत. अशातच हिंदुस्थानात तिसरी लाट येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान कोरोनाचा आणखी एक धोकादायक प्रकार दक्षिण आफ्रिकेसह जगातील अनेक देशांमध्ये समोर आला आहे. असे बोलले जात आहे की, हा नवीन व्हेरिएंट पूर्वीपेक्षा अधिक संसर्गजन्य ठरू शकतो. तसेच लसीकरणानंतरही या व्हेरिएंटचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकबल डिजीस (एनआयसीडी) आणि क्वाझुलु नेटाल रिसर्च इनोव्हेशन अँड सिक्वेन्सिंग प्लॅटफॉर्मच्या शास्त्रज्ञांना पहिल्यांदा या विषाणूची माहिती मिळाली होती. कोरोनाचा हा नवीन C.1.2 व्हेरिएंट पहिल्यांदा मे महिन्यात समोर आला होता. यानंतर आता ऑगस्टपर्यंत चीन, कांगो, इंग्लंड, न्यूझीलंड, पोर्तुगाल आणि स्वित्झर्लंडमध्ये याचे रुग्ण आढळले आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान सापडलेल्या व्हेरिएंटपैकी, C.1 व्हेरिएंटपेक्षा C.1.2 मध्ये अधिक बदल दिसून आले आहेत. याच कारणामुळे याला व्हेरिएंट ऑफ इंट्रेस्टच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे.



























































