कोरोना योद्धा पोलिसांसाठी प्रादेशिक विभाग स्तरावर ‘हेल्प डेस्क’

कोविडविरोधात नागरिकांच्या सुरक्षेसाठी ढालीप्रमाणे लढणाऱया पोलिसांनाही कोरोना आपल्या जाळ्यात ओढू लागला आहे. आतापर्यंत अनेक पोलीस कोरोनामुळे शहीद झाले. त्यामुळे याची गंभीर दखल घेत कोरोनाची लागण झाल्यास पोलिसांना झटपट मदत मिळावी, उपचाराकरिता कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आता प्रत्येक प्रादेशिक विभाग स्तरावर कोविड-19 ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्यात आला आहे.

कोरोनापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी अख्खे पोलीस दल रस्त्यावर तैनात आहे. गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासून पोलीस इन ऍक्शन आहेत. परिणामी पोलिसांनाही कोरोनाने गाठले आणि आतापर्यंत शेकडो पोलीस कोरोनाच्या युद्धात शहीद झाले. गतवेळेस कोरोनाने भयंकर रूप घेतले होते तेव्हा पोलिसांना वैद्यकीय मदत मिळावी यासाठी मुख्य नियंत्रण कक्षात ‘हेल्प डेस्क’ सुरू करण्यात आला होता. पण अख्ख्या मुंबई पोलीस दलासाठी एकमेव हेल्प डेस्क असल्याने तिकडून हवी तशी झटपट मदत मिळत नव्हती.

त्या हेल्प डेस्कवर ताण पडत होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांनी याचा गांभीर्याने विचार करीत यावेळेस कोरोनाची लागण होणाऱया पोलीस अधिकारी अथवा कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटलमध्ये पटकन बेड मिळावा, रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता भासू नये तसेच इतर वैद्यकिय मदत झटपट मिळावी यासाठी शहरातील पाच प्रादेशिक विभाग स्तरावर हेल्प डेस्क तयार करण्यात आले आहेत.

यामुळे त्या त्या प्रादेशिक विभाग विभागात कार्यरत असणाऱया अधिकारी-कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी काही अडचणी येत असल्यास त्यांना संबंधित प्रादेशिक विभागातील हेल्प डेस्कला संपर्क साधून झटपट मदत मिळवता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या