बांधकाम सुरू असलेल्या रस्त्यालाच पडल्या भेगा; नगर परिषद कंत्राटदारावर मेहेरबान? नागरिकांची चौकशीची मागणी

>> सूरज बागड, भंडारा

भंडारा शहरातील बांधकाम सुरू असतानाच रस्त्याला भेगा पडल्या असून कामाची गुणवत्ता किती उत्तम असेल ते यावरून दिसून येते असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून येत आहे.

भंडारा नगर परिषद अंतर्गत शहरात कोट्यावधी रुपयांची सिमेंट रस्त्यांची कामे सुरू आहेत. राजकीय नेत्याच्या जवळच्या आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला शहरातील सर्वच कामे दिली आहेत, असा आरोप होत आहे. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मोठा बाजार परिसरात कोट्यवधी रुपयाचं सिमेंट रस्त्याचं बांधकाम सुरू आहे. रस्ता तयार करण्यासाठी प्रेशर मशीनच्या माध्यमांतून रस्ता बनवायला पाहिजे पण कंत्राटदार मजुरांच्या हातानी रस्त्याची घोटाई करत आहे. दुसरीकडे सध्या रस्त्याचं काम सुरू असताना जागोजागी भेगा पडल्या असून हा रस्ता पूर्ण होण्याआधीच भेगा पडू लागल्याने नागरिकांचा पैसा नगर परिषद कंत्राटदाराच्या खिशात घालत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कंत्राटदार, इंजिनिअर यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.

भंडारा शहरातील रस्ते दुरूस्ती करिता कोट्यवधी निधी नगर परिषद खर्च करत आहे. शहरातील एकाच कन्स्ट्रक्शन कंपनीला काम मिळाल्यामुळे कंत्राटदारांची मनमर्जी सुरू आहे. या कंत्राटदाराला नगर परिषदेचं अभय असल्याचं बोललं जात आहे. मात्र या विषयी नगर परिषद मुख्याधिकारी यांना विचारणा केली असताना त्यांनी चौकशी करू असं हवेत उत्तर दिलं. मात्र ज्यांच्या विधानसभा क्षेत्रात कामे सुरू आहेत ते आमदार नरेन्द्र भोंडेकर यांनी कंत्राटदारांची गय केली जाणार नसून लवकरात चौकशी करून दोषींवर कारवाई होणार असल्याचं सांगितलं आहे.

एकाच रस्त्याचं बांधकाम सुरू असताना भेगा पडल्या आहेत. आर्या कन्स्ट्रक्शन कंपनीला शहरातील इतर कामे देखील आहेत.