
नारळाच्या झाडाला ‘कल्पवृक्ष’ म्हणतात. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग करता येतो. असे असतानाही खोबरे खाऊन झाल्यानंतर बहुतेक जण कसलाही विचार न करता करवंटी फेकून देतात. धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील चुडाणे जिल्हा परिषद शाळेतील सुनील मोरे या शिक्षकाने मात्र टाकाऊ करवंटीपासून हजारो शोभिवंत वस्तू तयार केल्या आहेत. नोकरी सांभाळून गेली अनेक वर्षे ते आपला छंद जोपासत आहेत. विशेष म्हणजे कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता आजवर शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी याचे विनामूल्य प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराचा मार्गदेखील उपलब्ध करून दिला आहे.
सध्याच्या धावपळीच्या युगात केवळ नोकरी, व्यवसायापुरती बांधीलकी न ठेवता पर्यावरणासाठीदेखील काहीतरी केले पाहिजे या उद्देशाने सुनील मोरे यांनी टाकाऊ करवंटीपासून शोभिवंत वस्तू बनवायला सुरुवात केली. कामानिमित्त कोकणात असताना डिसेंबर 2008 मध्ये त्यांना पर्यटनासाठी सिंधुदुर्गात जाण्याचा योग आला. समुद्रकिनारी असलेल्या एका स्टॉलवर शहाळ्यापासून तयार केलेल्या माकड, घुबड अशा प्रतिकृतींनी त्यांचे लक्ष वेधले. त्या प्रतिकृती न्याहाळताना आपल्यालादेखील असे काही करता येईल का? असा विचार त्यांच्या मनात डोकावला. त्यानंतर कोणत्याही प्रशिक्षण, मार्गदर्शनाशिवाय केवळ जिद्द, चिकाटी आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांनी करवंटीपासून शोभिवंत बनवायला सुरुवात केली.
घरातच साकारले कलादालन
सुनील मोरे यांनी आजवर करवंटीपासून मासे, नारळाचे झाड, फुले, दागिने, शोपीस, फुलपाखरे, स्मृतिचिन्ह, सामाजिक संदेश देणाऱया कलाकृती, गणपती, पक्ष्यांची घरटी, मोबाईल स्टॅंड, ढोलकी अशा बऱयाच वस्तू तसेच कासवाच्या शंभर प्रतिकृती तयार केल्या आहेत. एक कलाकृती बनवण्यासाठी त्यांना 2 ते 4 तास लागतात. करवंटीला आकार देण्यासाठी ते हॅकसा ब्लेड, पॉलिश पेपर, एमसील आदी साहित्याचा वापर करतात. घरातच त्यांनी कलादालन उभारले आहे. त्यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल घेऊन आजवर त्यांना मोठमोठय़ा व्यासपीठावर पुरस्कृत केले आहेत. याशिवाय ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ आणि ‘ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड’नेदेखील दखल घेतली आहे.
मंदिरात मोठय़ा श्रद्धेने भाविक देवाला नारळ अर्पण करतात. मात्र त्याचा वापर झाल्यावर करवंटी फेकून दिली जाते. या करवंटय़ा शेवटी उकिरडय़ावर, गटारीत पडलेल्या आढळतात. त्यामुळे गटारी तुंबतात तर कधी रोगजंतू त्यावर अंडी घालतात. याच कारणामुळे टाकाऊ करवंटीपासून मी क्रिएटिव्ह वस्तू बनवायला सुरुवात केली.
– सुनील मोरे, शिक्षक