डे-नाईट कसोटीसाठी 27 हजार प्रेक्षक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटानंतर ‘टीम इंडिया’ प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱयावर जाणार आहे. कोरोना काळातील हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा होय. या दौऱयात ‘टीम इंडिया’ 17 ते 21 डिसेंबर या कालावधीत अॅडलेड मैदानावर डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या स्टेडियमवर 27 हजार प्रेक्षकांना सामना बघायला परवानगी दिली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना बऱयापैकी आटोक्यात आल्याने आता हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेसाठी 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डे-नाईट कसोटी होणार असलेल्या अॅडलेड मैदानाची प्रेक्षक क्षमता 54 हजार आहे. त्यामुळे या मैदानावर 27 हजार प्रेक्षक कसोटी बघायला येऊ शकतील.

बॉक्सिंग डे कसोटीला 25 टक्केच प्रेक्षक!

ख्रिसमसनंतर पहिल्या आठवडय़ात बॉक्सिंग डे कसोटी सुरू होत असते. मेलबर्न येथे होणाऱया या कसोटीसाठी 25 हजार प्रेक्षकांना मैदानावर येण्यास परवानगी देण्यात आली आहे. या मैदानाची प्रेक्षक क्षमता एक लाख आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिक्टोरिया सरकार आणि मेलबर्न क्रिकेट क्लब यांनी मिळून कोविड सुरक्षा योजना तयार केली आहे. त्यामुळे या मैदानावर 25 टक्केच प्रेक्षकांना सामना बघण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कांगारूंचे वर्चस्व

आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात 14 डे-नाईट कसोटी सामने पार पडले आहेत. डे-नाईट कसोटी लढतींमध्ये कांगारूंनी म्हणजेच ऑस्ट्रेलियाने वर्चस्व कायम राखले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने सात लढतींमध्ये विजय मिळवला आहे. या सर्व लढती ऑस्ट्रेलियाने मायदेशातच जिंकलेल्या आहेत. अॅडलेड, ब्रिस्बेन व पर्थ येथे या लढती खेळवण्यात आल्या आहेत.

परदेशातील पहिली डे-नाईट कसोटी

‘टीम इंडिया’ने आतापर्यंत केवळ एकच डे-नाईट कसोटी सामना खेळलेला आहे. बांगलादेशविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या या कसोटीत हिंदुस्थानने बाजी मारली होती. ऑस्ट्रेलियाने अॅडलेड मैदानावर न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड व पाकिस्तान या चार संघांविरुद्ध डे-नाईट कसोटी खेळलेल्या असून सर्व सामन्यांत बाजीही मारलेली आहे. हिंदुस्थानी संघ क्रिकेट इतिहासातील दुसरी, तर परदेशातील पहिली डे-नाईट कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. आता बघूया यात कोण बाजी मारते ते?