मुंबई-महाराष्ट्रच्या लढतीत आंध्रला लॉटरी; अनिर्णित सामन्यामुळे मुंबई-महाराष्ट्राचा निक्काल

पहिल्या डावातील धावसंख्येची झालेली अनपेक्षित बरोबरी आणि त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा डाव गुंडाळण्यात मुंबईला लाभलेल्या यशामुळे नाटय़मय वळणावर पोहोचलेल्या रणजी लढतीने सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकवले. मुंबईसमोर विजयासाठी  30 षटकांत 253 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. मुंबई जिंकू किंवा मरू ध्येयानेच मैदानात उतरला आणि महाराष्ट्राच्या गोलंदाजीवर तुटून पडला. पण मुंबईचे प्रयत्न अपुरे पडले आणि रणजी करंडकातील भवितव्य ठरविणारा सामना अनिर्णितावस्थेत संपला. या सामन्यातून उभय संघांना एकच गुण मिळाल्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राचे रणजी करंडकातील आव्हान संपुष्टात आले. मात्र महाराष्ट्रबरोबरचा सामना हरणारा आणि गुणतालिकेत महाराष्ट्राइतकेच 26 गुण मिळविणारा आंध्र प्रदेशचा संघ केवळ जास्त विजय मिळविल्यामुळे उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला.

शम्स मुलानीने 81 धावांत 4 विकेट टिपल्यामुळे महाराष्ट्रचा दुसरा डाव 252 धावांवर आटोपला. महाराष्ट्राची 6 बाद 101 अशी बिकट अवस्था झाली होती, पण अझीम काझी (75) आणि सौरभ नवले (47) यांनी सातव्या विकेटसाठी 98 धावांची भागी रचून महाराष्ट्राला द्विशतकी आकडा गाठून दिला.

मुंबईला 253 धावांचे आव्हान 30 षटकांत गाठायचे होते. दिव्यांश सक्सेनाच्या घणाघातीमुळे मुंबईने धावसंख्येचा जोरदार पाठलाग केला, पण वेगात धावा काढण्याच्या प्रयत्नात मुंबईचे विकेट कोसळत होते. त्यातच सक्सेना बाद झाल्यावर मुंबईच्या वेगालाही खीळ बसली आणि तिथेच मुंबईचे विजयाचे प्रयत्नही थांबले. अखेर मुंबईने 27.3 षटकांत 6 बाद 196 धावा केल्या होत्या. तेथेच दोन्ही संघांनी सामना थांबविण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र सर्वात दुर्दैवी

या रणजी मोसमातील महाराष्ट्र हा एकमेव असा संघ ठरला आहे जो एकही लढत हरला नाही, तरीही स्पर्धेबाहेर फेकला गेला. या मोसमात साखळी स्पर्धेत उत्तराखंड, कर्नाटक आणि पंजाब या संघांना एकाही पराभवाला सामोरे जावे लागले नाही. स्पर्धेत सर्वाधिक पाच विजय मिळविणारा मध्य प्रदेशही एका सामन्यात हरला. छत्तीसगडला सर्वाधिक चार पराभव पत्करावे लागले तर ते खेळलेला एकही सामना अनिर्णित सुटला नाही. तोच एकमेव संघ आहे, ज्याचा एकही सामना अनिर्णित राहिला नाही.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्चित

‘ब’ गटातून उपांत्यपूर्व फेरीसाठी सौराष्ट्र आणि आंध्र प्रदेश हे दोन संघ पात्र ठरले आहेत. ‘अ’ गटातून बंगाल आणि उत्तराखंड तर ‘क’ गटातून कर्नाटक आणि झारखंड अव्वल दोन संघ ठरले. ‘ड’ गटातून मध्य प्रदेश आणि पंजाबने बाजी मारली. त्यामुळे आता मध्य प्रदेश विरुद्ध आंध्र प्रदेश, पंजाब विरुद्ध सौराष्ट्र, कर्नाटक विरुद्ध उत्तराखंड आणि झारखंड विरुद्ध बंगाल अशा लढती रंगतील.