भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (बीसीसीआय) रेड बॉस क्रिकेटला चालना देण्यासाठी मास्टर प्लॅन आखत आहे. या नव्या प्लॅनमुळे रणजी आणि कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची चांगलीच चांदी होणार आहे. कसोटी आणि रणजी क्रिकेटकडे खेळाडू आकर्षित व्हावेत, यासाठी बीसीसीआय मॅच फी वाढवण्याचा विचार करत आहे. बीसीसीआयने 2023-24 साठी टिम इंडियाच्या खेळाडूंची वार्षिक करार यादी जाहीर केली आहे. यात 30 खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.
सध्या बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट, रेड बॉल क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करत आहे. खेळाडू आकर्षित व्हावेत, यासाठी बीसीसीआय मॅच फी वाढवण्याचा विचार करत आहे. तसेच कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या वेतनातही वाढ करण्याबाबत विचार होत आहे. तसेच आगामी काळात टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या कराराचे मूल्यही वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत आराखडा तयार करण्यासाठी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि नवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे. कसोटी क्रिकेट आणि प्रथम श्रेणी मॅचच्या फीमध्ये तिप्पट वाढ करण्याची शिफारस आल्याची माहिती मिळाली आहे. एखादा खेळाडू वर्षभर रणजी खेळला तर त्याला सुमारे 75 लाख रुपये मिळायला हवे. याची सरासरी आय़पीएल सामन्याशी जुळणारी आहे. तसेच वर्षभ सर्व कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूला 15 कोटी रुपये मिळायला हवे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.