ICC कडून विश्वचषक प्लेइंग 11 ची घोषणा; टीम इंडियाच्या सहा खेळाडूंना मिळाले स्थान

क्रिकेट विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियाने रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर टीम इंडियाचा 6 गडी राखत पराभव केला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप उंचावला. मात्र, आयसीसीने जाहीर केलेल्या स्पर्धेतील सर्वोत्तम संघात ऑस्ट्रेलियाच्या केवळ दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. तर आयसीसीच्या विश्वचषक प्लेईंग 11 चे कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे. तसेच टीम इंडियाच्या 6 खेळाडूंचा समावेश या सर्वोत्तम संघात करण्यात आला आहे.

वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकला रोहितसह सलामीचे स्थान देण्यात आले आहे. क्विंटनने या स्पर्धेत 107.2 च्या सरासरीने 594 धावा ठोकल्या आहेत. त्यात चार शतकांचा समावेश आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने 174 धावांची विक्रमी फटकेबाजी केली होती. रोहित शर्मा व विराट कोहली या दोघांनीच त्याच्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

रोहित शर्माकडे या संघाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सलग 10 विजयांची नोंद करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्याने या स्पर्धेत 597 धावा फटकावल्या आहेत. सलामीला फलंदाजी करत टीम इंडियाला दमदार सुरुवात करण्याचे काम रोहितने चोख बजावले. त्याने 125.94 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली आणि ग्लेन मॅक्सवेल व हेनरिच क्लासेन यांचाच स्ट्राईक रेट त्याच्यापेक्षा जास्त राहिला आहे.

विराट कोहली या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक 765 धावा करून विक्रमाची नोंद केली. सचिन तेंडुलकरने 2003 मध्ये 673 धावा केल्या होत्या आणि विराटने हा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, टीम इंडियाचा रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, श्रीलंकेचा दिलशान मधुशंका, ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा आणि टीम इंडियाच्या मोहम्मद शमी यांची या सर्वोत्तम संघात निवड झाली आहे. बारावा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिका गेराल्ड कोएत्झी याची निवड झाली आहे. तर या सर्वोत्तम संघात पाकिस्तान, अफगानिस्तान, इंग्लंड, नेदरलैंड्स आणि बांग्लादेशच्या एकाही खोळाडूला स्थान मिळालेले नाही. आयसीसीने खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारावर प्लेईंग 11 ची घोषणा केली आहे.

विश्वचषक 2023 मधील टॉप-5 स्कोरर

विराट कोहली – 765 रन
रोहित शर्मा – 597 रन
क्विंटन डिकॉक – 594 रन
रचिन रवींद्र – 578 रन
डेरेल मिचेल – 552 रन

विश्वचषक 2023 मधील टॉप-5 विकेट टेकर

मोहम्मद शमी – 24 विकेट
एडम जाम्पा – 23 विकेट
दिलशान मदुशंका – 21 विकेट
जसप्रीत बुमराह – 20 विकेट
गेराल्ड कोएत्जी – 20 विकेट

आयसीसीची वर्ल्ड कप प्लेइंग-11

क्विंटन डिकॉक, रोहित शर्मा (कप्तान), विराट कोहली, डेरेल मिचेल, केएल राहुल, ग्लेन मैक्सवेल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, दिलशान मदुशंका, एडम जाम्पा और मोहम्मद शमी.
12वा खेळाडू : गेराल्ड कोएत्जी (जलदगती गेंदबाज)