रोहित शर्माच टी-20 मध्ये द्विशतक झळकावू शकतो; माजी ऑस्ट्रेलियन फिरकीवीर ब्रॅड हॉगचा विश्वास

720

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप कोणालाही द्विशतक झळकवता आलेले नाही. मात्र क्रिकेटच्या या प्रकारात द्विशतक झळकवण्याची करामत हिंदुस्थानचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा करू शकतो, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज ब्रॅड हॉग याने व्यक्त केला आहे.

एका सोशल साइटवर चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ब्रॅड हॉग म्हणाला, सध्याच्या क्रिकेटविश्वात रोहित शर्मा हा एकमेव फलंदाज असा आहे की, तो टी-20मध्ये द्विशतक झळकवू शकतो. फलंदाजी करताना त्याचा स्ट्राइक रेट चांगला असतो. टायमिंगही परफेक्ट असते. चौफेर फटकेबाजी करण्यातही तो माहीर आहे.

रोहित शर्माने वन डेत तीन वेळा द्विशतक झळकवले असले तरी त्याला अद्याप टी-20मध्ये द्विशतक झळकवता आलेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या ऍरोन फिंचने टी-20मधील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. त्याने 2018 साली झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना 172 धावा फटकावल्या होत्या.

सावध रहा, काळजी घ्या

रोहित शर्माने सोशल साइटवर कोरोना व्हायरसबाबत जनतेला आवाहन केले आहे. तो यावेळी म्हणाला, गेल्या काही आठवडय़ांपासून आपल्या अडचणी वाढत आहेत. संपूर्ण जगात जे काही सुरू आहे त्यामुळे दुःख होते. अशा वेळी आपल्या सर्वांना एकत्र होण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सावध रहा आणि काळजी घ्या. आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल सर्व माहिती ठेवा. कोरोना व्हायरससंदर्भातील लक्षणे आढळली तर तातडीने रुग्णालयात अथवा वैद्यकीय पथकाकडे जा, असेही रोहित यावेळी म्हणाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या