
हिंदुस्थानी संघाला कोरोनामुळे या वर्षी (2020) मार्च महिन्यानंतर जास्त प्रमाणात क्रिकेट खेळायला मिळाले नाही. हिंदुस्थानी क्रिकेटपटू थेट आयपीएलमध्ये खेळले आणि आता टीम इंडियाचा संघ ऑस्ट्रेलियन दौऱयावर गेला आहे. या दौऱयात हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियामध्ये चार कसोटी, तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. मात्र 2020 सालामध्ये कमी प्रमाणात क्रिकेट खेळणाऱया टीम इंडियाला 2021 सालामध्ये अर्थातच पुढल्या वर्षी नॉनस्टॉप क्रिकेट खेळायचे आहे. पुढल्या वर्षी 14 कसोटी, 16 वन डे व 23 टी-20 सामन्यांचा थरार रंगणार आहे. याशिवाय हिंदुस्थानचा संघ आशियाई कप व टी-20 वर्ल्ड कपमध्येही सहभागी होणार आहे. तसेच आयपीएलच्या पुढील मोसमातही टीम इंडियाच्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे.
इंग्लंड मालिकेने सुरुवात
हिंदुस्थानचा संघ पुढल्या वर्षी सुरुवातीला इंग्लंडशी दोन हात करणार आहे. यामध्ये प्रत्येकी चार कसोटी, वन डे व टी-20 लढतींचा समावेश आहे. त्यानंतर आयपीएलचे आयोजन करण्यात येईल. हिंदुस्थानचा संघ जून महिन्यात श्रीलंकेला जाईल. तिथे तीन वन डे व पाच टी-20 सामने होतील. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वेमध्ये तीन वन डे सामन्यांची मालिका खेळेल. यानंतर हिंदुस्थानचा संघ इंग्लंडमध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरदरम्यान पाच कसोटी सामन्यांत झुंज देईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑक्टोबर महिन्यात हिंदुस्थानी दौऱयात पाच टी-20 व तीन वन डे सामने खेळेल. न्यूझीलंडचा संघ नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात दोन कसोटी व तीन टी-20 त हिंदुस्थानशी दोन हात करील. डिसेंबर महिन्यात टीम इंडियाचा संघ तीन कसोटी व 3 टी-20 सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला रवाना होईल.
मायदेशात होणार टी-20 वर्ल्ड कप
हिंदुस्थानात 2021 सालामध्ये टी-20 वर्ल्ड कपचे आयोजनही करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात खेळवण्यात येणार आहे. तसेच जून-जुलै महिन्यात आशियाई कपचे आयोजनही करण्यात आले आहे. या दोन महत्त्वाच्या स्पर्धांवरही टीम इंडियाच्या खेळाडूंच्या नजरा असतील यात शंका नाही.
रोटेशन पॉलिसीचा अवलंब करणार
आयसीसीकडून आंतरराष्ट्रीय दौऱयांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येते. यामुळे धकाधकीचे वेळापत्रक असले तरी त्याचे पालन करावेच लागते. खेळाडूंसाठी हे आव्हानात्मक असेल. पण सध्या हिंदुस्थानात युवा व हरहुन्नरी खेळाडूंची कमतरता नाहीए. तसेच अशा परिस्थितीत रोटेशन पॉलिसीचाही अवलंब करण्यात येईल, असे स्पष्ट मत बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱयाने एका मीडियाशी बोलताना व्यक्त केले.


























































