मिलते है ब्रेक के बाद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी , [email protected]

हिंदुस्थान-न्यूझीलंड सामन्यामध्ये पाऊस प्राणपेक्षा खतरनाक खलनायक ठरलाय. नॉटिंगहॅमला त्याने साखळीतला सामना उधळून लावला. मँचेस्टरला पुन्हा धुमाकूळ घातला. सध्या पावसाची सटकलीय! मुंबईला डुबवलं. मग मोर्चा अमेरिकेतल्या व्हाईट हाऊसकडे वळवला आणि मँचेस्टर तर त्याचं हल्ल्याचं शहर आहे. मुंबईत तो कोसळतो. इथे मँचेस्टरमध्ये ठिबकला. पण आऊटफिल्डला ओलंचिंब करायला तो पुरेसा होता. तोपर्यंत हिंदुस्थानी संघाची सामन्यावर पकड होती. टॉस जिंकूनसुद्धा 46.1 षटकांत न्यूझीलंडने 5 बाद 211 धावांपर्यंत मजल मारली होती. एरवी समृद्ध असलेल्या न्यूझीलंडला रेशनिंगचे दिवस कसे असतात हे धावा काढताना कळलं.

सकाळी हिंदुस्थानी व्यवस्थापनाने संघ जाहीर केल्यावर त्यात शमीचं नाव नाही हे पाहून अनेकांना धक्का बसला. शमीला श्रीलंकेविरुद्ध विश्रांती देणं आपण समजू शकतो, पण आकाश तर्र दिसताना शमी नाही हे अनेकांना खटकलं. मला व्यक्तिशः फक्त पाच गोलंदाज घेऊन खेळणं खटकतं. विशेषतः बाद फेरीत! एखाद्या गोलंदाजाने जरी मार खाल्ला किंवा एका सामन्यात भुवनेश्वर जायबंदी झाला तसा कुणी गोलंदाज जायबंदी झाला तर काय होऊ शकतं विचार करा. त्याची षटकं कोण टाकणार? धोनीला पॅडस् सोडावी लागतील. विराटला खांद्याला कामाला लावायला लागेल किंवा रोहित शर्माला आपण ऑफस्पिन कधी टाकला होता ते आठवावं लागेल. एक फलंदाज कमी करायला हिंदुस्थानी संघाला एवढी का भीती वाटते?

हिंदुस्थानी संघाच्या मॅनेजमेंटलसुद्धा फलंदाजांची मधली फळी कचकडय़ाची वाटते का? त्यांचाही धोनीच्या फलंदाजीवरचा विश्वास उडाला आहे का? नसेल तर रोहित, विराट, राहुल, पांडय़ा फॉर्मात असताना दिनेश कार्तिकच्या फलंदाजीच्या कुबडय़ा का लागतात.

न्यूझीलंडने आकाशात ढग असतानाही फलंदाजी घेतली. त्याला दोन कारणं असावीत. एक म्हणजे खेळपट्टी नवीन होती. तिच्या स्वभावाची कल्पना नव्हती. आणि ‘ड्राय’ असताना दुसऱ्या डावात हिंदुस्थानी फिरकी गोलंदाजी खेळणे कठीण जाईल असा हिशेब त्यांनी मांडला. आणि ज्या पद्धतीने जाडेजा-चहलने चेंडू सुरुवातीला वळवला, काही वेळा मध्येच उसळवला त्यावरून त्यांच्या निर्णयामागची भूमिका योग्य होती असे वाटले.

rain-in-machester-cricket-g

स्विंग आणि वेगाच्या टॉनिकवर वाढलेल्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना बुमराचा वेग, स्विंग हा विषासारखा वाटला असेल. काय नव्हतं त्याच्या गोलंदाजीत? वेग अनपेक्षित, उसळी, स्विंग, खेळपट्टीला साजेसा टप्पा आणि अचुकता! बुमराची गोलंदाजी ही ‘गोलंदाजीत त्या अचुकतेची’ व्याख्या झालीय. त्यांचा बुमराच्या गोलंदाजीशी झिम्मा सुरू होता. गप्टील तर किती मरणं जगला! गप्टीलच्या बॅटला मिलनासाठी, चेंडूचा होकार मिळतच नव्हता. प्रेमभंगाच्या दुःखात तिने आत्महत्या करताना जो झेल स्लिपमध्ये विराटने पकडला तो आगीचा गोळा होता. नंतर दोनदा त्याने बोटावर ट्रिटमेंट घेतली.

विराटने दोन स्लिप, एक गली लावून आक्रमण केले विल्यमसनसाठी. तर त्याने स्लिप, गली, शॉर्ट थर्डमॅन, थर्डमॅन लावला. कारण तिथून विल्यमसन नकळत धावा चोरतो. मग स्कोअरबोर्डकडे पाहिलं की माल किती चोरीला गेलाय हे कळते. बुमरा-भुवनेश्वरने इतक्या घट्ट मुसक्या न्यूझीलंडच्या फलंदाजांच्या बांधल्या की त्यांनी पहिला चौकार 47 चेंडूंनंतर प्रसवला. डावऱ्या निकोल्सने बुमराला अप्रतिम ऑफड्राइव्ह मारला. पहिली बेडी सुटली असे त्यांना वाटलं असेल.

पण पुढच्या बेडय़ा सोडण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हाराकिरी केली नाही. विल्यमसन आणि त्यांचा आधीचा कर्णधार बेण्डन मॅक्युलममध्ये हा फरक आहे. रोमन योद्धय़ाप्रमाणे दिसणारा मॅक्युलम आक्रमणाच्या नावाखाली बेदरकार व्हायचा. विल्यमसन सावध आहे. त्याने निकोल्सबरोबर टिपिकल गवंडय़ाच्या कष्टाने, धावांची एकावर एक वीट ठेवत भागीदारी केली. ही जोडी फोडणारा जाडेजाचा चेंडू खासच होता. तो आत आला, उसळला, वळला आणि बॅट-पॅडमध्ये इतका शिताफीने घुसला की घरफोडी करणाऱ्या चोरानेही त्याला गुरू मानावे. घर लुटल्याची भावना फलंदाज निकोल्सच्या चेहऱ्यावर होती.

पुन्हा मॅक्युलम-रॉस टेलर या न्यूझीलंडच्या जोडीने धावांची दुसरी भिंत उभारायचा प्रयत्न केला. त्यांचे हे उभारणे जाडेजा-चहलच्या फिरकीने कमालीचे कष्टप्रद केले. चेंडू वळण्याची आणि उसळण्याची भीती त्यांना जाणवते असे वाटत होतंच; पण गोलंदाजीही अचूक होती. 13.4 षटकांच्या फिरकीच्या भोवऱ्यात न्यूझीलंडला एकही चौकार मारता आला नाही. यावरून किती जड बेडय़ा फिरकी गांलंदाजीने ठोकल्या याची कल्पना येईल. तुरुंगातून बाहेर पडायला विल्यमसनने काही मोठे फटके मारले. पण मंद खेळपट्टीवर त्याचा फटका चुकला आणि जाडेजाने आयुष्यातील सोप्यातला सोपा झेल घेतला. त्याआधी या दोन अनुभवी फलंदाजांची जोडी फोडण्यासाठी विराटने एक स्पेल बुमराला दिला. त्याने विकेटला जन्म देणारा चेंडूही ठोकला. पण धोनीला ऐनवेळी बाळंतपण जमले नाही. जगप्रसिद्ध गायनॉकॉलॉजिस्टही काही वेळ चूक करू शकतो.

हिंदुस्थानी गोलंदाजीने पहिल्या 180 चेंडूंत 98 डॉट बॉल टाकले. चौकारांवर जिझिया कर होताच. पण एकेरी धावांसाठीही टेन्शनिंग होते.

40व्या षटकानंतर न्यूझीलंडच्या संघात धावा काढण्याच्या स्वातंत्र्याचे वारे वहायला लागले. त्याचे नेतृत्व रॉस टेलरने स्वीकारले. त्यानंतर 37 चेंडूंत पाऊस येईपर्यंत 56 धावा झाल्या. रॉस टेलरने स्वाईपचा वापर केला. आणि त्या दबावाखाली चहलची एक ओव्हर महाग पडली. पांडय़ाने थोडा मार खाल्ला. मुख्य म्हणजे दबावाखाली काही ओव्हरथ्रो झाले, मिसफिल्ड झाले. कोहलीचा चेहरा हा त्याच्या मनाचा आरसा आहे. त्या आरशात त्याच्या मनाचे प्रतिबिंब दिसले. पाऊस आला तेव्हा न्यूझीलंडवर टाकलेला दबाव शिथिल होतोय का असे वाटायला लागले.

मग पाऊस पिरपिरला. तो कोसळत नाही. किंचित ओला करतो. पावसाची पिरपिर आणि पंचांचं इन्स्पेक्शन हा काळ अत्यंत वाईट असतो. पत्रकारांना आणि प्रेक्षकांनाही सकाळी मँचेस्टरला पिकॅडलीहून मी ट्रामने मैदानावर आलो तेव्हा मुंबईच्या लोकलमध्ये बसलोय असं वाटावं एव्हढी गर्दी होती. सर्व भारतीय होते. एका तरुणाच्या एका हातात सकाळी नऊ वाजता बियर कॅन होता आणि दुसऱ्या हातात हिंदुस्थानचा झेंडा सेलिबेशनला. सकाळपासूनच सुरुवात झाली होती. मैदानात पाऊस ठिबकला आणि दुसरीकडे बियर वाहत होती. (आपल्याकडे पैसा पाण्यासारखा वाहिला म्हणतो, इथे पैसा बियरसारखा वाहिला असं म्हणत असावेत.) स्टॅण्डच्या आसपासच्या एखादा जुना क्रिकेटपटू दिसला की त्याच्याभोवती गराडा पडे. आपण गांगुली, लक्ष्मणभोवती गराडा समजू शकतो, पण आयसीसीच्या डेव्ह रिचर्डसनलाही गराडा पाहून हुंदका आला असेल.  पण मला हुंदका वुर्केरी रामनसाठी आला. त्याला कुणी ओळखले नाही.

तर आता उद्या ही मॅच पुन्हा सुरू होणार म्हणजे  न्यूझीलंड उरलेले 23 चेंडू खेळणार आणि मग हिंदुस्थानची फलंदाजी. हिंदुस्थानला सर्वच बाबतीत त्याचा फायदा आहे. शेवटच्या 23 चेंडूंसाठी न्यूझीलंडला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. म्हणजे किंचित का होईना सेट होणं आलं. हिंदुस्थानच्या फलंदाजीच्या वेळेस कदाचित आऊटफिल्ड सुकलेलं असेल. कारण या क्षणी तरी हवामान खातं पावसाची शक्यता दाखवत नाही. कदाचित वातावरण ढगाळ असू शकतं. सुरुवातीला बोल्टची काही षटकं नीट खेळून काढली तर हिंदुस्थानचंच पारडं जड असेल.