
छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये एक दुर्दैवी घटना घडली असून व्हिलचेअर क्रिकेट टुर्नामेंटसाठी निघालेल्या एका 38 वर्षीय दिव्यांग खेळाडूचा मृत्यू झाला आहे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर अचानक विक्रमची तब्बेत खालावली असता आपत्कालीन क्रमांकावर अनेक वेळा फोन करण्यात आला, परंतु वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे एका चांगल्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या हजरत निझामुद्दीने स्टेशनवरुन बुधवारी (4 जून 2025) रात्री विक्रम सिंग व्हिलचेअर क्रिकेट टुर्नामेंटसाठी संघासोबत ग्वालियरला चालला होता. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळाने विक्रमची तब्बेत अचानक बिघडली. त्यानंतर संघातील इतर खेळाडूंनी व सहकाऱ्यांनी तत्काळ रेल्वे हेल्पलाईनला फोन केला आणि वैद्यकीय मदतीची मागणी करण्यात आली. अनेकवेळा फोन करत मदतीची मागणी केली, परंतु त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तसेच ट्रेन 90 मिनिटे उशीरा होती. सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी ट्रेन मथुरा स्टेशनवर पोहोचली. तोपर्यंत विक्रमचा मृत्यू झाला होता. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.