
बारमध्ये बार डान्सरला आक्षेपार्ह नाचण्यासाठी कशा प्रकारे उचकवले गेले याचा पुरावा नसल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने चार ग्राहकांचा गुन्हा रद्द केला.
मोहित माकड व अन्य तिघांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. न्या. नितीन सांबरे व न्या. सचिन देशमुख यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. माकड व त्याचे सहकारी बार डान्सरला आक्षेपार्ह नाचण्यासाठी कशा प्रकारे उचकवत होते याची साक्ष एकाही साक्षीदाराने दिलेली नाही. पुराव्यांअभावी याचिकाकर्त्यांविरोधात खटला चालवता येणार नाही, असे नमूद करत न्यायालयाने ही याचिका मंजूर केली.
काय आहे प्रकरण
बांगूर नगर पोलिसांनी 2017मध्ये एका डान्स बारवर धाड टाकली. माकड व त्याचे सहकारी तेव्हा बारमध्ये होते. बार डान्सरला आक्षेपार्ह नाचण्यासाठी ते भडकवत होते, असा पोलिसांचा आरोप होता. याचा गुन्हाही नोंदवण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले. आम्ही आक्षेपार्ह नाचण्यासाठी कशा प्रकारे बार डान्सरला उचकवत होतो, अशी साक्ष कोणीही दिलेली नाही. हा गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
पोलिसांचा विरोध
ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावावी. कारण याचिकाकर्ते दोषमुक्तीसाठी सत्र न्यायालयात अर्ज करू शकतात. उच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करून गुन्हा रद्द करू नये, असा युक्तिवाद सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी केला होता.
न्यायालयाचे निरीक्षण
याचिकाकर्ते बार डान्सरला नाचण्यासाठी उचकवत होते, असा दावा साक्षीदारांनी केला आहे. पण कशा प्रकारे उचकवले जात होते याचा तपशील कोणाच्याच साक्षीत नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले.