दीड हजारात बनवून द्यायचे कोविड लसीचे प्रमाणपत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीड हजार रुपये घेऊन कोविड लसीचे बनावट प्रमाणपत्र बनवून देणाऱ्या दोघांना क्राईम ब्रँच युनिट-10 ने अटक केली. सूरज गुप्ता आणि मोहम्मद खालिद फारुकी अशी त्या दोघांची नावे आहेत. उत्तर प्रदेश येथील एक डॉक्टरही त्या दोघांना बनावट प्रमाणपत्र देत असल्याचे तपासात समोर आले आहे.

अंधेरी येथे एक जण अवघ्या दीड हजार रुपयात लस न घेतादेखील कोविडचे प्रमाणपत्र बनवून देत असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश ठाकूर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज चौधरी, विजय सांडभोर, मोरे, पानसरे, चव्हाण यांच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी कोविड लस प्रमाणपत्रासाठी सूरजकडे बनावट ग्राहक पाठवला. गेल्या वर्षी मृत झालेल्या व्यक्तीच्या आधारकार्डची प्रत सूरजकडे दिली.

लस प्रमाणपत्रासाठी सूरजने दीड हजार रुपये लागणार असल्याचे बनावट ग्राहकाला सांगितले. पैशाचे डील झाल्यानंतर सूरज हा बनावट प्रमाणपत्र घेऊन आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्या चौकशीत फारुकीचे नाव समोर आले. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली. त्या दोघांना उत्तर प्रदेश येथील एक महिला डॉक्टर ही बनावट प्रमाणपत्र बनवून देत असायची. त्या प्रमाणपत्राच्या मोबदल्यात महिला डॉक्टरला 200 ते 500 रुपये मिळत होते अशी माहिती तपासात समोर आली आहे. या टोळीने आतापर्यंत 12-15 जणांचे बनावट प्रमाणपत्र बनवून दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्या दोघांना अटक करून पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.