
अहमदपूर शहरातील गिताई नगर येथे चोरट्यांनी वस्तीतील घरफोडी करून 4 लाख 80 हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून पोलीस अधिक तापस करत आहेत.
अहमदपूर शहरातील गिताई नगर येथील शिक्षक रमेश बिराजदार व त्यांच्या पत्नी शिक्षिका मिनाक्षी बिराजदार हे दांपत्य गुरूवारी ( ता.11) रोजी सकाळी आपल्या घराला बाहेरून कुलूप लावून कोपरा येथे आपल्या शाळेला गेले. शाळा सुटल्यानंतर रक्षाबंधन निमित्त रमेश बिराजदार आपल्या बहिणीकडे आष्टा गावी तर मीनाक्षी बिराजदार या आपल्या भावाकडे लातूरला गेल्या. त्यांच्याकडे दोन भाडेकरु आहेत. गुरूवारी रात्री बारा ते शुक्रवारी पहाटे पाचच्या दरम्यान घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा मोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. दागिने असलेल्या कपाटाची चावी घरातच होती. चोरट्यांच्या कपाटाची चावी हाती लागल्याने कपाट उघडण्यास त्यांना तसदी लागली नाही. घरात कोणी नसल्याने चोरट्यांना कपाट उघडून त्यातील प्रत्येक वस्तू तपासण्यास वेळ मिळाला.
कपाटातील 5 तोळ्याचे गंठण, 14 ग्रॅमचे मिनी गंठण, 3 ग्रॅमचे तोळ्याचे कानातील रींग, 8 ग्रॅमचे कानातील झुमके, 1 तोळ्याची अंगठी व इतर असे एकूण नऊ तोळे पाच ग्रॅम सोने असा आजच्या बाजार मुल्य प्रमाणे चार लाख पंचाहत्तर हजार व रोकड सहा हजार असा एकूण चार लाख एक्केऐंशी हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.या संदर्भात रमेश बिराजदार यांच्या फिर्यादी वरून गुन्हा नोंद झाला असून पुढील उपास पोलिस निरीक्षक चितंबर कामठेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. तसेच श्वान पथकास पाचारण करण्यात आले आहे . श्वान घरापासून हजार फुट अंतरावरील तळेगाव रोड पर्यंत गेला. तळेगाव रोड वरून चोरटे वहानाने गेले असावेत.घराच्या मुख्य दरवाजा सागवानी असल्याने त्याला असलेला ओतीव कडी कोयंडा सहज मोडून घरात प्रवेश केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.


























































