
खेड तालुक्यातील गुणदे फाटा येथे एका मुलाला पळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्य़ाला रंगेहात पकडण्यात आले आहे. या चोरट्याने मुलाला पळविण्याआधी घराची रेकी केली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी चोराला बेदम चोपून पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलीस अधिक तपास करत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील गुणदे फाटा येथे कुऱ्हाड, कोयता यासारखी हत्यारे तयार करणे, हत्याराने धार लावणे अशी कामे करणारे घिसाडी समाजाचे कुटुंब राहते. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंब आपल्या लहान मुलासह झोपडीत झोपले होते. पहाटे झोपडीत काही तरी हालचाल झाल्याचे जाणवले त्यामुळे कुटुंब प्रमुखाची झोप मोड झाली. झोपडीत कोण शिरलं आहे हे पाहण्यासाठी त्याने विजेचे बटन दाबले पण विजेचा दिवा पेटला नाही. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच कुटुंब प्रमुख सतर्क झाला मात्र त्याच वेळी त्याला अंथरुणावर झोपलेल्या आपल्या मुलाच्या पायाला धरून कुणीतरी त्याला पळविण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्याने क्षणाचाही विलंब न करता मुलाला पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर झडप घातली आणि त्याला पकडले. मुलाला पळविण्याचा प्रयत्न करणाऱ्याने त्याच्याशी झटापट करून ;पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने त्याला चांगलेच जखडून ठेवले.
एका मुलाला पळवून आणण्याचे 20 हजार मिळायचे
यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून या ठिकाणी गर्दी जमा झाली आणि मुलाला पळविण्याचा प्रयत्न झाला हे समजताच त्या चोरट्याला चांगलेच बदडून काढले. जमलेल्या जमावाने त्या चोरट्याला मुलाची चोरी का आणि कशासाठी करत होतास अशी विचारणा केली असता त्याने दिलेले माहिती अतिशय धक्कादायक आहे. त्या चोरट्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात मुलं पळविणाऱ्यांचे रॅकेट फार मोठे आहे. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण हे कुणालाच माहित नाही. आमची जबाबदारी केवळ लहान मूलं उचलून ती संबधीत यंत्रणेकडे पोहचवायची, एका मुलामागे त्यांना 20 हजार रुपये दिले जातात. पुढे त्या मुलाचे काय होते हे माहित नाही. देशभर अशा प्रकारे मुलं पळविणारे रॅकेट सक्रिय आहे. आतापर्यंत अनेक मुलांना पळवून नेण्यात आले असल्याचे या चोरट्याने सांगितले.
मुलं पळविणारे मोठे रॅकेट असल्याची चोरट्याची कबुली
माहिती देताना तो म्हणाला या झोपडीतील मुलाला पळविण्यासाठी मी 15 दिवस या झोपडीची रेकी करत होतो. आज सकाळी संधी मिळताच मी झोपडीत शिरलो. माझी चाहूल लागल्यावर कुणी लाईट लावू नये म्हणून मी झोपडीतील दोन्ही विजेचे दिवे काढले त्यामुळे कुटुंब प्रमुखाने विजेचे बटन दाबल्यावर देखील दिवे लागले नाहीत. मला त्या मुलाला पळवून न्यायचे होते माझ्यावर ती जबाबदारी होती पण माझा प्रयत्न फसला अशी कबुली या चोरट्याने दिली. येथील नागरिकांनी या घटनेची खबर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या चोरट्याला ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यात मुलांना पळविणारी टोळी सक्रिय झाली असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र ही अफवा असावी असे बोलले जात होते. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग यांनी देखील मुलांना पळविणारी टोळी अफवा असल्याचे म्हटले होते मात्र आज पहाटे गुणदे फाटा येथे मुलाला पळविण्याचा झालेला प्रयत्न , चोरट्याला रंगेहात पकडण्यात आलेले यश आणि चोरट्याने तशी दिलेले कबुली यामुळे मुलाला पळविणारी टोळी ही अफवा नसून या बातमी खरी आहे यावर शिकामोर्तब झाले आहे.






























































