
पेट्रोल पंप देण्याच्या नावाखाली 45 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ठगाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने बिहार येथून अटक केली. गौरवराज अनिल प्रसाद असे त्याचे नाव असून तो बिहारच्या शेखपुरा येथून कॉल सेंटर चालवत होता. त्याच्याकडून 7 मोबाईल, 14 एटीएम कार्ड, 5 सीमकार्ड आणि 7 सीमकार्डचे कव्हर, अनेक बँकांचे पास बुक जप्त केले आहे. त्याच्या दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
मालाड येथील एका व्यावसायिकाला नांदेड येथे पेट्रोल पंप सुरू करायचे होते. मार्च महिन्यात त्यांनी पेट्रोल पंपच्या लायसन्ससाठी ऑनलाइन सर्च केले तेव्हा त्यांना एक वेबसाईट दिसली. त्या वेबसाईटवर माहिती भरल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना रोहित गुप्ता नावाच्या व्यक्तीचा फोन आला. रोहितने भूलथापा मारून एका बनावट साईटवर तक्रारदाराचे लॉगिन आणि पासवर्ड तयार करून दिला. त्यानंतर नव्या पेट्रोल पंपासाठी प्रोसेजर म्हणून 19 हजार 500 रुपये भरण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून व्यावसायिकाने ते पैसे एका बँक खात्यात जमा केले. भूलथापा मारून रोहितने त्यांच्याकडून 45 लाख रुपये उकळले. पैसे देऊनही पेट्रोल पंपाबाबत तो टाळाटाळ करू लागल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर व्यावसायिकाने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलमध्ये धाव घेतली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांनी तपासाच्या सूचना दिल्या. झोन-12 चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सरला वसवे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक विनोद कनावजे, सहायक अनुराधा पाटील, पीएसआय शेवाळे, सचिन सावंत, गायकवाड, आयरे, पावसकर, दळवी, शिराळकर, सूर्यवंशी, मस्तूद, मेघे यांच्या पथकाने तपास सुरू केला. 6 जूनला पोलीस पथक बिहारच्या शेखपुरा येथे गेले. तेथे त्यांनी दोन दिवस रेकी केली आणि शेखपुरा येथे सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करून गौरवराजच्या मुसक्या आवळल्या. गौरवला आज बोरिवली येथील न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
फसवणुकीच्या पैशात जमिनी विकत घेतल्या
गौरवराज याने फसवणुकीच्या पैशातून शेखपुरा येथे जमिनी विकत घेतल्या असून सोनेदेखील खरेदी केले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून एक सोनसाखळी जप्त केली आहे. फसवणुकीत विकास नावाचा मुख्य आरोपी असून तो पूर्वी दिल्लीत कॉल सेंटरमध्ये काम करायचा. तेथे त्याने फ्रॉड केल्यावर तो शेखपुरा येथे आला. त्यानंतर विकास, गौरवराजने बनावट कॉल सेंटर सुरू केले.
पाच लाख वाचवले
फसवणुकीचे पैसे ज्या खात्यात जमा झाले होते त्याची माहिती सावंत यांनी काढून ती अनुराधा पाटील यांना दिली. पोलिसांनी वेळेत कारवाई करून तक्रारदाराचे 5 लाख रुपये वाचवले आहेत. आरोपी बनावट केवायसी करून खात्यात जमा झालेले पैसे काढून त्यानंतर ते पैसे काढायचे.



























































