
मद्यपान करून हातात कोयता घेत सराईताने गुलटेकडी परिसरात हैदोस घातला. त्यानंतर परिसरातील चायनीय खाद्यपदार्थ विक्रेत्या तरूणाच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना दोन दिवसांपुर्वी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वसिम अन्सारी (वय 30, रा. कोंढवा) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वसीम यांचा चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. दोन दिवसांपुर्वी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ते पत्नीला भेटण्यासाठी गुलटेकडीतील इंदिरानगरमध्ये गेले होते. त्यावेळी तेथे मद्यपान करून हातात कोयता घेऊन आलेल्या सराईताने गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यामुळे नागरिकांची पळापळ सुरू झाली. त्यानंतर सराईताने वसीमला अडवून त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर हातातील कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सराईत आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे यांनी दिली आहे.



























































