कोरोनीलमुळे बाबा रामदेव आणि पतंजलीविरोधात जुन्नर न्यायालयात तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगगुरू बाबा रामदेव आणि त्यांच्या पतंजली कंपनीने आणलेल्या कोरोनील औषधाविरोधात जुन्नर मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या औषधाविरोधातील ही महाराष्ट्रातील पहिली तक्रार असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोनील औषधामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा केला जात असून ही शुद्ध फसवणूक असल्याचं तक्रारदाराचं म्हणणं आहे. मदन कुऱ्हे (25 वर्ष) असं तक्रारदाराचं नाव असून तो कायद्याचे शिक्षण घेत आहे. न्यायालयाने कुऱ्हे याला आयुष मंत्रालयाने बाबा रामदेव आणि त्यांच्या कंपनीला पाठवलेल्या नोटीस सादर करण्यास सांगितले आहे.

कुऱ्हे हा मराठवाडा मित्र मंडळ कायदा महाविद्यालयात शिकत आहेत. त्यांनी बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे अध्यक्ष आचार्य बाळकृष्ण यांच्याविरोधात फसवणूक, कट रचणे प्राणघातक साथरोग पसरवण्यास कारणीभूत ठरणे आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ही तक्रार दाखल केली आहे. कुऱ्हे यांनी 24 जून 2020 रोजी बाबा रामदेव यांच्या काही वृत्तवाहिन्यांवर मुलाखती पाहिल्या होत्या. या मुलाखतींमध्ये त्यांनी दावा केला होता की पतंजलीने तयार केलेल्या औषधामुळे कोरोनाशी निगडीत आजार बरे होतात. महामारीच्या काळात अशा भूलथापांद्वारे लोकांच्या मनात खोटी आशा निर्माण करणे आणि त्याद्वारे नफा कमावणे हे बेकायदेशीर आणि बेजबाबदारपणाचे लक्षण असल्याचं कुऱ्हे यांनी म्हटले आहे. कुऱ्हे यांचे वकील असीम सरोदे यांनी या तक्रारीबाबत बोलताना म्हटले की हा लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असून हे आरोग्य अधिकाराचेही उल्लंघन आहे.