राफेल खरेदीवरून पंतप्रधानांवर टीका; राहुल गांधी यांना 2 ऑगस्टपर्यंत दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-new

राफेल विमान खरेदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘चौकीदार चोर है’ अशी टीका करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सोमवारी उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. गिरगावच्या दंडाधिकारी न्यायालयात भाजपच्या कार्यकर्त्याने दाखल केलेल्या खटल्यावरील स्थगिती न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी 2 ऑगस्टपर्यंत कायम ठेवली आहे.

राहुल गांधी यांनी 2018 मध्ये राजस्थानमधील सभेत राफेल विमान खरेदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर टीका केली होती. त्यावेळी त्यांनी ‘कमांडर-इन-थीफ, चौकीदार चोर है, चोरों का सरदार,’ अशी विधाने केली होती. या विधानांमुळे पंतप्रधान मोदींसह भाजप व पक्ष कार्यकर्त्यांची प्रतिमा देशभर मलिन झाली, असा दावा करीत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी राहुल गांधी यांच्याविरुद्ध गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. त्यावर दंडाधिकाऱ्यांनी 28 ऑगस्ट 2019 मध्ये फौजदारी कारवाई करीत राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. त्या समन्सला राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली.