शनि महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शनिवारी आलेल्या दर्शअमावास्येचे निमित्त साधून आज शनिमहाराजांच्या दर्शनासाठी शनिशिंगणापूर येथे भाविकांनी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत जवळपास तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शनिमहाराजांची पहाटेची मुख्य आरती मुंबई येथील अन्नदाते मेहतानी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आली.

शनिवारी सकाळी 9 वाजता दर्श अमावास्येला प्रारंभ झाला. शनिशिंगणापुरात सकाळी भाविकांची गर्दी कमी होती. दुपारनंतर गर्दीमध्ये वाढ होत गेली. सायंकाळपर्यंत तीन लाख भाविकांनी शनिमहाराजांचे दर्शन घेतले. दुपारची माध्यान्ह महाआरती झिम्बाब्वे येथील शनिभक्त जयेश यांच्या हस्ते करण्यात आली. दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तसेच हजारो भाविकांनी पाचशे रुपये शुल्क भरून चौथऱयावर जाऊन शनिमूर्तीला अभिषेक करीत दर्शन घेतले. कडक उन्हाचा फटका भाविकांना बसला. सायंकाळची आरती उद्योगपती सौरभ बोरा, डेंटल कौन्सिल सदस्य राहुल हेगडे यांच्या हस्ते झाली. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बाणकर, कार्यकारी अधिकारी गोरख दरंदले, उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे आदी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. सोनई व शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी पेट्रोलिंग करीत यात्रेतील गर्दीवर नजर ठेवून होते.

अवैध रिक्षा वाहतूक खुलेआम सुरू

यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या वाहनांसाठी दोन किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे ऐन उन्हात भाविकांना पायी मंदिरात यावे लागत होते. याचा फायदा घेत अवैध रिक्षा वाहतूक खुलेआम सुरू असल्याचे दिसून आले. एक ते दीड किलोमीटर अंतरासाठी भाविकांकडून 20 रुपये उकळण्यात येत होते. या अवैध रिक्षांमुळे पायी चालणाऱया भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला.