
खुनाच्या प्रयत्नातील आरोपीची जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी टोळक्याने जमाव जमवून फटाके फोडले. त्याशिवाय नागरिकांना शिवीगाळ करून सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना शिवणे परिसरात काल घडली आहे. याप्रकरणी पाच सराईतांना अटक करण्यात आली आहे.
सागर भालेराव वारकरी (21), अविनाश रामप्रताप गुप्ता (20), आकाश सिब्बन गौड (19), सागर राजेंद्र गौड (19), सूरज राजेंद्र गौड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या सहा ते सात साथीदारांविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संतोष सुदाम नांगरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्यावर्षी एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. संबंधित आरोपी काल जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या साथीदारांनी शिवणे परिसरात एकत्रित येऊन हैदोस घातला. जमावबंदीचे आदेश झुगारून जोरजोरात घोषणाबाजी करीत फटाके फोडले. त्यानंतर रस्त्यावरील नागरिकांना शिवीगाळ करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी पाचजणांना अटक करण्यात आली आहे. उत्तमनगर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.































































