
उपनगरीय मार्गावरील लोकल गाडय़ांना आणखी वेग देण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका टाकण्यात येणार आहे. 2010 पासून प्रस्तावित असलेल्या या मार्गिकेचे अद्याप एक इंचही काम झालेले नाही. मात्र प्रकल्पाचा खर्च दुप्पटीने फुगला असून 537 कोटी रूपयांवरून तब्बल 890 कोटींवर गेला आहे. तसेच या मार्गिकेत अनेक रहिवाशी इमारती येत असल्याने त्यांचे स्थलांतरण कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या मर्गिका कधी होणार असा सवाल केला जात आहे.
सीएसएमटी-कुर्ला दरम्यान सध्या चार मार्गिका असून त्यापैकी एक आणि दोनवरून धिम्या गाडय़ा चालवल्या जातात. तर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेवरून जलद लोकलसह लांब पल्ल्याच्या गाडय़ा चालवल्या जातात. कुर्ल्याच्या पुढे कल्याणपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका आहे. मात्र सीएसएमटी कुर्ला दरम्यान नसल्याने जलद लोकलबरोबरच लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ा चालवण्यास मर्यादा येतात. त्यापार्श्वभूमीवर 2010 मध्ये एमआरव्हीसीच्या माध्यमातून एमयुटीपी-2 अंतर्गत सीएसएमटी-कुर्ला दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका टाकण्यासाठी आराखडा तयार केला होता. तेव्हा प्रकल्पाचा खर्च 537 कोटी होता. त्यामध्ये आता दुप्पटीने वाढ झाली आहे.
– मुंबई रेल विकास कार्पेरेशनने (एमआरव्हीसी) एमयुटीपी-2 अंतर्गत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन केले होते. सध्या एमयुटीपी-3 ची मुंबईत मोठय़ा प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र एमयुटीपी-2 मध्ये असलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे अद्याप काम सुरू झालेले नाही.
एलिव्हेटेडचा एकमेव पर्याय
पाचव्या-सहाव्या मार्गिकेमध्ये अनेक रहिवाशी इमारती येतात. त्याबाबत सरकार कोणताच ठोस निर्णय घेत नाही. त्यामुळे प्रकल्प लटकला आहे. सदरच्या इमारतींना धक्का न लावता सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वेच्याच जागेत उन्नत (एलिव्हेटेड) मार्गा बनवण्याचा एकमेव पर्याय आहे. मात्र त्यासाठी मोठा खर्च येणार असल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.






























































