
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या मुद्दय़ावर मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. लाखो प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल केला. मात्र पुढील कारवाई थंड का पडली? आंदोलक रेल्वे कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई का केली जात नाही? असे संतप्त सवाल प्रवासी संघटनांकडून उपस्थित केले जात आहेत.
9 जून रोजी मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. त्या घटनेप्रकरणी रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या दोघा अभियंत्यांवर गुन्हा दाखल केला. त्याच्या निषेधार्थ 6 नोव्हेंबर रोजी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन केले होते. दरम्यान, आंदोलक कर्मचाऱ्यांची पाठराखण केली जात असेल तर आम्ही निदर्शने करून संबंधितांची पोलखोल करू, असा इशारा मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी दिला आहे.
























































