कॉन्सर्ट फोटोवर येताहेत काळे डाग, ग्राहकांच्या तक्रारी; आयफोन एअरचा कॅमेरा सदोष

आयफोन 17 सीरिजच्या फोनची काल शुक्रवारपासून विक्रीला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी फोन खरेदी करण्यासाठी मुंबई, दिल्ली या ठिकाणी तरुणांनी ऍपल स्टोअर बाहेर प्रचंड गर्दी केल्याचे दिसले. हजारो लोकांनी नवा आयफोन खरेदी केला आहे. परंतु, आयफोन एअरच्या कॅमेऱयात खराबी असल्याच्या तक्रारी ग्राहकांनी केल्या आहेत. फोटो घेताना ग्राहकांना अडचणी येत असून फोटोसुद्धा क्लिअर येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ऍपल कंपनीने पहिल्यांदाच या फोनला लाँच केले आहे. हा फोन खूपच स्लिम आणि वजनाने हलका आहे. आयफोन एअरमध्ये बग असून कॉन्सर्ट फोटो घेतल्यास 10 पैकी एका फोटोवर काळे डाग येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. एलईडी डिस्प्ले घेताना ही समस्या येत आहे.

हे एक सॉफ्टवेअर बग

ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पाडल्यानंतर ऍपल कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. हे एक विशेष लायटिंग कंडिशनमध्ये होते. हा एक प्रकारचा सॉफ्टवेअर बग आहे. याला ठीक केले आहे, असे ऍपल कंपनीने म्हटले आहे. पुढील अपडेटमध्ये याला फिक्स रोलआउट केले जाईल, असेही ऍपलने म्हटलेय. परंतु, पुढचे अपडेट कधी आहे, हे मात्र कंपनीने सांगितले नाही.

किंमत आणि फिचर्स

आयफोन एअरला तीन स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. 256 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 1,19,900 रुपये, 512 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 1,39,900 रुपये आणि 1 टीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 1,51,9000 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनला क्लाउड व्हाइट, स्काय ब्लू, लाइट गोल्ड आणि स्पेस ब्लॅक अशा चार रंगात लाँच केले आहे. या फोनमध्ये 6.3 इंचाचा ओलेड डिस्प्ले, 120 एचझेड रिफ्रेश रेट, आयओएस 26, ए19 प्रो प्रोसेसर, 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल प्लस 12 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 18 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.