
कोणतीही माहिती मिळवण्यासाठी किंवा प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गूगलचा वापर करण्यात येतो. मात्र, बंगळुरूतील एका महिलेला गुगल सर्च करणे महागात पडले आहे. एका गुगल सर्चमुळे हॅकर्सने या महिलेच्या बँक खात्यातील सर्व रक्कम उडवली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून भामट्यांचा शोध सुरू आहे. फसवणूक करणाऱ्या टोळक्यांनी आता गुगल सर्चला नवे हत्यार बनवले आहे.
बंगळुरूतील एका महिलेला झोमॅटो अॅपवर कस्टमर केअरचा नंबर मिळाला नाही, म्हणून तिने गुगल सर्च केले. गुगल सर्चवर जो नंबर दिसला त्यावर तिने कॉल केला. कॉल केल्यानंतर महिलेला बोलण्यात गुतंवून तिला रिफंड रिक्वेस्ट देण्याच्या बहाण्याने तिच्याकडून बँक खात्याची माहिती घेण्यात आली. झोमॅटो कस्टमर केअरचा नंबर असल्याचे समजून महिलेनेही बँक खात्याची सर्व माहिती दिली. त्यानंतर लगेचच त्या महिलेच्या खात्यातून सर्व रक्कम भामट्यांनी लंपास केली आहे. चौकशी केल्यानंतर गुगल सर्चवर आलेला नंबर झोमॅटो कस्टमर केअरचा नसल्याचे उघड झाले आहे. महिलेने आणि झोमॅटोने याबाबत तक्रार दाखल केली आहे. याआधीही असे प्रकार घडले आहेत. चेन्नईतील एका महिलेने गुगल सर्चवरून मिळालेल्या नंबरवर संपर्क केला. त्यावेळी तिच्याकडे बँक खात्याचा पासवर्ड मागितला. तिला संशय आल्याने तिने खोटा पासवर्ड सांगितला. कॉल संपल्यावर तिला चुकीच्या पासवर्डमुळे 10 हजार आणि 5 हजाराचे व्यवहार रद्द केल्याचा मेसेज आला. तिने चुकीचा पासवर्ड दिल्याने तिचे पैसे वाचले आहेत.
याआधी मुंबईतही असे प्रकार घडले आहेत. फसवणूक करणाऱ्या टोळक्याने गुगल सर्चवर ईपीएफओ कार्यालयाचा फोन नंबर बदलला होता. या नंबरवर कॉल केल्यास बँक खात्याची माहिती घेऊन बँक खात्यातील रक्कम उडवण्यात येत होती. ईपीएफओ कार्यालयाचा नंबर समजून लोकंही बँक खात्याची माहिती देत होते. अशा फसवणुकीमुळे अनेकांची आयुष्यभराची पूंजी लुटली गेली आहे. काही महिन्यांपूर्वी अमूल डेअरीने गूगलला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गुगल सर्चमध्ये अमूलच्या जाहिरातींचा गैरवापर करण्यात येत असल्याचे नोटीसीत म्हटले होते. गुगल आणि गुगल मॅपमध्ये नंबर बदलण्याचा पर्याय उपलब्ध असतो. त्याचा वापर करून फसवणूक करणारे दुकान, बँक आणि संस्थाचे नंबर बदलतात. त्यामुळे यूजर्सने गुगल सर्चवरील कोणत्याही माहितीवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन फसवणूक आणि सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. तसेच गरज भासल्यास ऑफिशियल वेबसाइटवरूनच माहिती घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. बँक खात्यांबाबतची कोणतीही माहिती कोणालाही देऊ नये, अशा सूचनाही बँक आणि पोलिसांकडून देण्यात येत आहेत. दरम्यान, गुगलनेही अशा तक्रारींची दखल घेतली आहे.


























































