CWG 2022 सिंधूचा ‘गोल्डन’ स्मॅश, हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक

हिंदुस्थानची ‘सुवर्णकन्या’ पीव्ही. सिंधू हिने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये महिला एकेरीत गोल्ड मेडल पटकावले आहे. दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधू (PV Sindhu) आणि कॅनडाच्या मिशेल ली (Michelle Li) यांच्यात अंतिम सामना रंगला. सिंधूने 21-15 आणि 21-13 अशा दोन सरळ सेटमध्ये हा सामना जिंकत कॉमनवेल्थ गेम्समध्ये महिला एकेरीत पहिल्यांदा गोल्ड मेडल जिंकले.

गोल्ड मेडलसाठी झालेल्या या लढतीत पी.व्ही सिँधू हिने दमदार खेळाचे प्रदर्शन घडवले. पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला कॅनडाच्या खेळाडूनेही चांगला खेळ केला. 4-4 अशा बरोबरीनंतर सिंधूने मध्यांतरापर्यंत 11-8 अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने मागे वळून पाहिले नाही. जोरदार स्मॅश आणि कलात्मक ड्रॉपच्या जोरावर सिँधूने मिशेलवर वर्चस्व गाजवले आणि पहिला सेट 21-15अशा फरकाने जिंकला.

पहिल्या सेटप्रमाणे दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने आपला जबरदस्त खेळ कायम राखला. सुरुवातीपासून सिंधूने मिशेलवर दबाव टाकला आणि एकामागोमाग एक स्मॅश मारत 8-3 अशी आघाडी घेतली. त्यानंतर मिशेलने तीन पॉइंट घेत आघाडी कमी केली. मात्र मध्यांतरापर्यंत सिंधूने 11-6 अशी आघाडी घेतली. सिंधू 13-8 आघाडीवर असताना मिशेलने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंधूने तिला एकही संधी दिली नाही. दुसरा सेट 21-13 असा जिंकत सिंधूने गोल्ड मेडलवर नाव कोरले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

पंतप्रधानांकडून कौतुक

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीव्ही सिंधूचे कौतुक केलं एसून ती चॅम्पियनची चॅम्पियन असल्याचे म्हटले आहे. उत्कृष्टता म्हणजे काय हे ती वारंवार दाखवून देतेय. कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन, असे ट्विट मोदींनी केलंय.

चौथ्या स्थानावर झेप

दरम्यान, पीव्ही सिंधू हिने गोल्ड मेडल जिंकल्याने पदक तालिकेमध्ये हिंदुस्थानने चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. हिंदुस्थानकडे सध्या 19 सुवर्णपदक, 15 रौप्य आणि 22 कांस्यपदकासह एकूण 56 पदकांची कमाई केली आहे. हिंदुस्थानने न्यूझीलंडला मागे सोडत चौथे स्थान पटकावले आहे. हिंदुस्थानपुढे ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडा आहे.

CWG 2022 हिंदुस्थानच्या पोरी झुंजल्या, पण ‘सुवर्ण’ हुकले; थरारक लढतीत पराभवामुळे रौप्यपदकावर समाधान