
बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये हिंदुस्थानची ऐतिहासिक कामगिरी सुरुच आहे. वेटलिफ्टिंगमध्ये हिंदुस्थानने तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. अचिंता शिऊली याने पुरुषांच्या 73 किलो वजनी गटामध्ये ही सुवर्ण कामगिरी केली असून हिंदुस्थानच्या खात्यात सहावे पदक आले आहे.
73 किलो वजनी गटामध्ये रविवारी अचिंता शिऊली मैदानामध्ये उतरला होता. पहिल्यांदाच राष्ट्रकूल स्पर्धा खेळणाऱ्या या 20 वर्षीय खेळाडूने आपली ताकद दाखवून दिली. स्नॅच राऊंडमध्ये अचिंताने 143 किलो वजन उचलले, तर क्लीन अँड जर्क राऊंडमध्ये 170 किलो वजन उचलले. दोन्ही राऊंडमध्ये मिळून त्याने 313 किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक जिंकले.
Weightlifter Achinta Sheuli wins the third weightlifting gold for India in the men’s 73kg category at the #CommonwealthGames2022 pic.twitter.com/h6h1ZMZ5Zm
— ANI (@ANI) July 31, 2022
क्लीन अँड जर्कमध्ये अचिंताने पहिल्याच प्रयत्नामध्ये 166 किलो वजन उचलले. यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने 170 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने पुन्हा 170 किलो वजन उचलत विक्रम केला.
अचिंता आधी महिलांमध्ये मीराबाई चानू आणि पुरुषांमध्ये जेरेमी लालरिनुंगा याने सुवर्णपदकाची कमाई केली होती.
सहाही पदके वेटलिफ्टिंगमध्ये
यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन दिवसांत हिंदुस्थानने वेटलिफ्टिंग खेळात तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी पाच पदकांची कमाई केली. या सहा पदकांपैकी दोन पदके महिलांनी, तर चार पुरुषांनी जिंकली आहेत.





























































