आफ्रिकेत चक्रीवादळ; 180 ठार; हजारो बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मोझांबिक

आफ्रिकेतील मोझांबिक येथे आलेल्या चक्रीवादळाने हाहाकार उडवला आहे. या चक्रीवादळाचे नाव ‘इदाई’ असे आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल 180 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मोझांबिकचे राष्ट्राध्यक्ष फिलप न्युसी यांनी मृतांची संख्या एक हजारावर गेली असण्याची भीती व्यक्त केली आहे. या चक्रीवादळामुळे हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. ताशी 177 कि.मी. वाऱ्याच्या वेगाने आलेल्या या चक्रीवादळाने जनजीवन पार विस्कळीत करून सोडले आहे. जीव वाचवण्यासाठी अनेक लोक झाडांवर चढून बसले आहेत. त्यांची सुटका करण्याचे आणि सुखरूप माघारी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोणत्याही आफ्रिकन देशात आलेली ही आजवरची सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती आहे, असे म्हटले जात आहे. या वादळामुळे बैरा शहराचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या शहराची लोकसंख्या केवळ 5 लाख आहे. बैरा हे शहर सोफाला प्रांतात येते. या प्रांताचे राज्यपाल अल्बटो मोंडलेन यांच्या मते देशातील प्रत्येक जण आपत्तीचा सामना करीत आहे.

बचाव पथकात काम करणाऱ्या युनायटेड नेशनचे कर्मचारी जेराल्ड बोरुक यांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्तीग्रस्त परिसरात जवळपास सर्व घरे मोडकळीला आली आहेत. या आपत्तीत एकही इमारत वाचलेली नाही. वीज, दळणवळण यंत्रणा कोलमडली आहे. रस्त्यांवर सर्वत्र विजेचे खांब पडलेले आहेत. अनेकांनी आपली घरे गमावली आहेत. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे लोकांना लवकरात लवकर मदत पोहोचवणे हेच त्यांचे ध्येय आहे, असे जेराल्ड बोरुक म्हणाले.

इदाई नामक हे चक्रीवादळ केवळ मोझांबिक देशापुरतेच मर्यादित राहिले नाही तर ते आता झिम्बाब्वे व मालकी या दोन देशांतही पोहोचले आहे. या दोन देशांत आतापर्यंत एकूण 220 लोकांनी प्राण गमाकले आहेत. या तिन्ही देशांत राष्ट्रीय आपत्ती जाहीर करण्यात आली आहे.