मुंबईत 24 तासांत येणार दोन वादळे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘क्यारा’ आणि ‘महा’ चक्रीवादळाच्या तडाख्यातून बचावलेल्या मुंबईकरांना आणखी दोन चक्रीवादळांचा सामना करावा लागणार आहे. अरबी समुद्रात पुढील 24 तासांत एकाचवेळी ‘पवन’ pawan cyclone आणि ‘अम्फन’ amphan cyclone ही वादळे घोंघावणार आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच सर्व यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अरबी समुद्रात ‘क्यारा’ आणि ‘महा’ चक्रीवादळ निर्माण झाले होते. त्यामुळे सलग चार-पाच दिवस पावसाची रिपिरिप सुरू होती. त्याचप्रमाणे आता एकाच वेळी ‘पवन’ आणि ‘अम्फन’ वादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळेच आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. अरबी समुद्रात एकाच वेळी दोन वादळे निर्माण होण्याची ही परिस्थिती दुर्मिळ समजली जाते.

  • ‘पवन’ चक्रीवादळ सोमालियाच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे. प्रथम उत्तर-पश्चिम दिशेला व नंतर पश्चिम दिशेने पुढे सरकण्याची शक्यता आहे.
  • ‘अम्फन’ वादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रात घोंघावत असल्याने पुढील 24 तासांत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे.
  • महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीलगतचा समुद्र वादळाच्या काळात खवळलेला असणार आहे.
  • वादळादरम्यान वाऱ्याचा ताशी वेग 40-50 किलोमीटर एवढा असेल असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे.