नाशिक – सिलिंडर स्फोटातील चार जखमी मजूरांचा मृत्यू

file photo

गॅसगळतीमुळे मंगळवारी एका खोलीत सिलिंडरचा स्फोट झाला होता. हा स्फोट इतका भयानक होता की त्यात सात परप्रांतीय मजूर जखमी झाले होते. शुक्रवारी त्यातील चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भारतनगर येथील झोपडपट्टीतील एका खोलीत मंगळवारी पहाटे ही घटना घडली.

बिहारच्या मुजफ्फरपूर, लालगंज परिसरातील सात मजूर भारतनगरमध्ये एका खोलीत एकत्र राहत होते. सिलिंडरला लावलेल्या जुन्या नळीतून रात्रभर गॅसगळती सुरू होती. मंगळवारी पहाटे एकाने दिव्याचे बटण सुरू करताच स्पार्क होऊन सिलिंडरचा स्फोट झाला. यात गंभीररीत्या भाजलेले रशीद लतिक अन्सारी (30), मोहम्मद अमजद अब्दुल अन्सारी (30), मोहम्मद मुर्तजा अन्सारी (30) यांचा शुक्रवारी दुपारी तर मोहम्मद निसार अन्सारी (19) याचा रात्री जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुतुबुद्दीन अन्सारी, शोएब अन्सारी व आफताब अन्सारी यांना रुग्णालयाने डिस्चार्ज दिला असून ते बिहारला त्यांच्या मूळ गावी परतल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक चेतन श्रीवंत यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या