
सामना ऑनलाईन । मुंबई
तमसो मा ज्योर्तिगमय म्हणजे अंधरातून प्रकाशाकडे जाण्याचा सण… दिवाळी म्हणजे दिव्यांच्या आरास करण्याचा सण… सध्याच्या विभक्त कुटुंब पद्धतीत एकत्र येऊन सण साजरे करून संस्कृतीशी नाळ जोडण्याचा हा सण आहे. आपल्या प्रत्येक सणाप्रमाणे या सणालाही महत्त्व आहे. ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ आणि पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिवाळीतील प्रत्येक दिवसाचे महत्त्व सांगितले आहे.
सोमवारी धनत्रयोदशी आहे. धनाची देवता कुबेर आणि आरोग्याची देवता धन्वंतरी यांची पूजा करून ऐश्वर्य, संपत्तीसह दीर्घायुरोग्य़ लाभण्यासाठी आराधना करण्याचा दिवस.
नरक चतुर्थी मंगळवारी साजरी होत आहे. याच दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. त्यामुळे हा दिवस नरकचतुर्दशी म्हणून ओळखला जातो. या दिवशी अभ्यंगस्नानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
लक्ष्मीपूजन बुधवारी होत आहे. व्यापारी आणि उद्योजकासाठी व्यवहारात भरभराट होण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यात येते. सर्व परिसर दिव्यांच्या झगमगटाने उजळून निघतो. घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी या दिवशी पूजा करण्यात येते. व्यापारी त्यांचे चोपडीपूजनही या दिवशी करतात.
पाडवा गुरुवारी साजरा होणार आहे. या दिवशी मुलीने वडिलांना अभ्यंग स्नान घालून ओवाळायचे असते. वडील यथाशक्ती मुलीला भेटवस्तू देतात. बायको नवऱ्याला ओवाळते. कुटुंबीयांच्या उत्तम आरोग्यासाठी यादिवशी प्रार्थना करण्यात येते.
भाऊबीज म्हणजे यमव्दितीया शुक्रवारी साजरी होत आहे. या दिवशी बहिणीने भावाला ओवाळावे आणि भावाचे मंगल होण्याची प्रार्थना करावी ! भाऊ बहिणीला घसघशीत ओवाळणी देतात.

























































