
सामना प्रतिनिधी | परभणी
शहरातील कच्छी बाजार परिसरातील 9 दुकाने चोरट्यांनी फोडून अंदाजे रोख 40 हजार 200 रुपये लंपास केले आहेत. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून व्यापार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील कच्छी बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर दुकाने आहेत. परंतु, या परिसरात असलेले सर्वच पथदिवे बंद आहेत. तसेच दुकानासमोर पथदिवे नसल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी अंधार असतो. या अंधाराचा फायदा चोरट्यांनी घेत एकाच रात्री नऊ दुकाने फोडली. यामध्ये चोरट्यांनी कच्छी बाजारातील राजा मार्केटींग दुकानाचे शेटर हाताने काढून कॉऊटरमध्ये असलेली रोख व सोन्याचे नाणे असे एकूण 10 हजार 400 रुपये, श्रवण इलेक्ट्रानिक, प्रकाश ट्रेडर्स, बालाजी फुटवेअर, रुद्राक्ष जर्नल स्टोअर्स, न्यू.कोठारी टेड्रेस, संजय टेडर्स, इस्माईल अमर अॅण्ड कंपनी, सोनी टेडर्स दुकानाचे शेटर चोरट्यांनी हातानी काढून अंदाजे रोख 40 हजार 200 रुपये चोरून नेल्यांची घटना शनिवारी मध्यरात्री ते रविवारी पहाटेच्या दरम्यान घडली.
या घटनेची माहिती नानलपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस फौजफाट्यास दाखल झाले होते. यावेळी पोलीस निरीक्षक नागरगोजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय दगडवाल, स्थानिक गुन्हा शाखेचे मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी व्यापार्यांनी एकच गर्दी केली होती. याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञानात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन सीसीटीव्ही केली तपासणी
या परिसरात बसविण्यात आलेल्या दोन सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले असता तीन ते चार चोरटे आहेत. परंतु, अंधार असल्यामुळे चोरट्याचे स्पष्ट चेहरे दिसून आले नाहीत.

























































