
ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार झाला असून यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुष्मा अंधारे यांनी याप्रकरणात शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांचं नाव येत असल्यास त्यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी भूमिका मांडली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे भूमिका का घेत नाहीत? असा प्रश्न देखील सुष्मा अंधारे उपस्थित केला आहे.
ललीत पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे जिओग्राफीकल लोकेशन, फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल असंही त्या म्हणाल्या. ढिगभर पुरावे दिल्यानंतरही पोलीस, गृह मंत्रालय यावर काही कारवाई करत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान, ‘दादा भुसे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. मी चौकशीला सामोरे जायला तयार आहे’, अशी माहितीही दिली आहे.
ललित पाटील प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी ससून रुग्णालय प्रशासनाला धरले धारेवर
ससून रुग्णालयातून कैद्याने पलायन केल्याप्रकरणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांची धांगेकरांच्या प्रश्नांवर उत्तर देताना चांगलीच तारांबळ उडाली. धंगेकर यांनी ससूनचा कारभार असाच सुरु राहिला तर मात्र मला वाकड्यात शिरावं लागेल, अशी आक्रमक भूमिका यावेळी घेतली.
ससून रुग्णालयात मागील 9 महिने उपचार घेत असलेला आरोपी ललित पाटील याने मोठ्या प्रमाणत अंमली पदार्थ विकण्याचा प्रकार उघडकीस आणला होता. ह्या ललित पाटीलने काही दिवसांपूर्वी पोलिसांना चकवा देत रुग्णालयातून पलायन केले होते. त्यापार्श्वभूमीवर कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी मंगळवारी ससून रुग्णालयात भेट दिली. ससूनचे अधिष्ठता डाॅ.संजीव ठाकूर यांची भेट घेऊन त्यांनी कैदी कशाप्रकारे अनेक महिने रुग्णालयात ठेवले जातात व रुग्णालयाचा गैरकाभार कसा सुरु याबाबत जाब विचारला.
यावर अधिष्ठाता डॉ. ठाकूर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने रुग्णावर कुठले उपचार सुरू आहेत, याबाबत कायद्याने माहिती देता येऊ शकत नाही, असे कारण त्यांनी सांगितले. डॉ. ठाकूर यांच्या उत्तरामुळे धंगेकर संतापले. या प्रकरणात दोषी असणाऱ्या दोषी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत तेथून जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
धंगेकर म्हणाले, कोर्टला दिलेला रिपोर्ट गोपनीय कशाप्रकारे राहिल. दोषारोप पत्रासोबत ससून रुग्णालयात आरोपी बाबत जे ललित पाटील रुग्णाचे रिपोर्ट दिले त्याबाबत माहिती द्यावी. मला आरोपी किती दिवस रुग्णालयात होते याबाबतची माहिती मिळावी. मी सरळ तुम्ही प्रमुख असल्याने विचारणा करत असून अन्यथा मला वाकडयात शिरावे लागेल. असा कोणता आजार आहे ज्याचे उपचार अनेक महिने रुग्णालयात सुरु आहे. आठ ते नऊ महिने आरोपी राहतो व चार दिवसात त्याचा अहवाल तयार केला जातो. पुणे शहराला काळिमा फासणारा हा विषय असून त्याबाबत मोठी चर्चा आहे. रुग्णालयात सुरु असलेला भोंगळ कारभाराची दखल घेतलेली असून संबंधित रुग्णालयात व्हीआयपी सुविधा मोठया कैद्यांना मिळते ही बाब खेदजनक असल्याचे धांगेकर म्हणले.याप्रकरणी दिवाळी अधिवेशनात संबंधित विषय मांडून दाद मागण्यात येणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले आहे.
























































