‘व्हर्च्युअल रिऍलिटीद्वारे रुग्णांना घडले ‘दगडूशेठ’ बाप्पाचे दर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजारपणामुळे रुग्णालयातील खाटेवरुन कोठेही जाता न येणाऱया रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते. मात्र, इच्छा असूनही त्यांना विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयात राहून केवळ मनामध्ये गणरायाचे रूप साठवावे लागते. अशा रुग्णांना रुग्णालयातील खाटेवर बसून ‘दगडूशेठ’ गणपतीचे दर्शन घेत आरती करण्याचा आनंद देण्याची सुविधा ‘व्हर्च्युअल रिऑलिटी’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त ‘व्हर्च्युअल रिऑलिटी स्टार्टअप – डिजिटल आर्ट व्हीआरई’ या माध्यमातून पुण्यातील ससून रुग्णालयातील आयसीयू मधील रुग्णांना बाप्पाचे दर्शन दिले जात आहे. डिजिटल आर्ट व्हीआरई चे संस्थापक संचालक अजय पारगे यांची ही संकल्पना आहे. ‘व्हर्च्युअल रिऑलिटी’ ते रुग्ण प्रत्यक्षपणे उत्सव मंडपात आहेत आणि गणरायाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत असल्याचा भास त्यांना होत आहे. तसेच गुरुजींसोबत आरती करीत असल्याचा आनंददेखील रुग्णांना मिळत आहे. या दर्शनाचा आनंद घेताना अनेक रुग्णांना आनंदाश्रू अनावर झाले. आपण लवकर बरे व्हावे, यासाठी रुग्णांनी बाप्पाकडे प्रार्थना देखील केली.