
दहिसर चेक नाका येथील मोकळ्या जागेत 950 खाटांचे कोरोना हेल्थ सेंटर उभारण्यात येत आहे. या हेल्थ सेंटरचे काम सध्या वेगाने सुरू असून 15 जूनपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. या कामाची पाहणी आज महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली. मुंबई-मेट्रो रेल कार्पोरेशनकडून हे रुग्णालय उभारण्यात येत असून या ठिकाणी 618 बेड ऑक्सिजन यंत्रणेसह उपलब्ध राहणार आहेत.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पश्चिम उपनगरातील महत्त्वाच्या भगवती रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सुविधेचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक नगरसेवकांनी भगवती रुग्णालयात वाढीव बेड, ऑक्सिजन सिलिंडर आणि वाढीव आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर तातडीने कार्यवाही करून असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले. याबाबत उद्याच उपायुक्तांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी आमदार विलास पोतनीस, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी, नगरसेवक हर्षद कारकर, बाळकृष्ण ब्रिद, सुजाता पाटेकर, रिद्धी खुरसुंगे, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर, गीता सिंघण, उपायुक्त विश्वास शंकरवार, वैद्यकीय अधिकारी पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, रंगनाथ केसकर मार्गावरील शास्त्रीनगर आरोग्य केंद्र व एल. टी. महानगरपालिका दवाखान्यांची संयुक्त इमारत असलेल्या जागेत संशयित कोरोना रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी महापौर पेडणेकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.

























































