प्रायोगिक चाचण्यांसाठी सज्ज होतेय दहिसर-डी.एन.नगर मेट्रो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहिसर ते डी. एन. नगर मेट्रो-2 ए प्रकल्प लवकरच सुरू होईल असे संकेत दिसू लागले आहेत. येत्या मार्च-एप्रिलमध्ये या मार्गावर मेट्रोच्या प्रायोगिक चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यासाठी ओव्हरहेड वायर्स व अन्य आवश्यक उपकरणे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मेट्रो मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ट्विटरवरही यासंदर्भात माहिती दिली आहे. मार्च-एप्रिलमध्ये प्रायोगिक चाचण्या करण्यासाठी मेट्रो-2 ए च्या ओव्हरहेड कामांना सुरुवात करण्यात आली आहे असे ट्विट एमएमआरडीएने केले आहे. मेट्रो-2 ए बरोबरच दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मेट्रो-7 मार्गावरही प्रायोगिक चाचण्या घेण्याची एमएमआरडीएची तयारी सुरू आहे.

मेट्रो-2 ए हा मार्ग साडेअठरा किलोमीटरचा असून त्यादरम्यान 17 स्थानके आहेत. हा मार्ग पश्चिम रेल्वे, पश्चिम द्रुतगती महामार्ग, वर्सोवा-घाटकोपर मेट्रो-1 त्याचप्रमाणे काम सुरू असलेल्या मेट्रो-2 बी आणि मेट्रो-7 तसेच प्रस्तावित मेट्रो-6 ला जोडणारा असेल. पश्चिम आणि मध्य मुंबईतील अंतर या मेट्रोमुळे कमी होऊ शकणार आहे. बरोबरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ बराच वाचणार असून रस्त्यांवरील ट्रफिकही कमी होण्यास मदत होणार आहे.

असे असतील तिकीट दर

मेट्रो-2ए आणि मेट्रो-7 या मार्गांवरील तिकीट दरही संबंधित समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार 0 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी 10 रुपये, 3 ते 12 कि.मी.च्या प्रवासासाठी 20 रुपये, 12 ते 18 कि.मी.साठी 30 रुपये 18 ते 24 कि.मी.साठी 40 रुपये आणि 24 ते 30 कि.मी.साठी 50 रुपये तिकीट असणार आहे.