
कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात सोमवार, 30 डिसेंबरला म्हाडा कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवकुमार जैसवाल यांच्या दालनात घुसून त्यांना धक्काबुकी करणाऱ्या व्यक्तीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वा घडलेल्या या घटनेप्रकरणी खेरवाडी पोलीस ठाण्यात धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीसह सहा राज्यांमध्ये हुडहुडी
राजधानी दिल्लीसह उत्तर-पश्चिम आणि मध्य हिंदुस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दिल्ली, एनसीआर, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरण्याची शक्यता आहे. 3 ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान घसरू शकते. दरम्यान, बर्फवृष्टी झाल्यामुळे जम्मू-कश्मीरमधील तापमानात मोठी घसरण झाली.
मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर दिला भगवा रंग
पुण्यातील सदाशिव पेठेत ज्ञानप्रबोधिनी जवळ एका भिंतीला हिरवा रंग देऊन तेथे फुले, चादर टाकण्यात आली होती. या ठिकाणी जाऊन राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी या भिंतीला भगवा रंग देऊन तेथे गणपतीचा फोटो लावला. हा संपूर्ण प्रकार मेधा कुलकर्णी यांनी स्वतःच सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. त्यानंतर हा नेमका प्रकार काय आहे याची चर्चा सुरू झाली. त्या म्हणाल्या, एका दुकानाजवळ भिंतीला गडद हिरवा रंग देऊन तेथे फुले आणि फुलांची चादर चढवण्यात आली होती. उदबत्ती लावल्या. यापूर्वी कधीही तेथे असा हिरवा रंग देण्यात आलेला नव्हता. एक प्रकारे प्रार्थना स्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न होता. सोशल मीडियावरून ही गोष्ट लक्षात आल्यानंतर मी तिथे गेले. मी स्वतःच ती संपूर्ण भिंत भगवी करून टाकली. आणि तेथे गणपतीचा फोटो लावला.
बेल्हेमध्ये बांगलादेशी घुसखोराला अटक
बांगलादेश घुसखोरांविरुद्ध दहशतवाद प्रतिबंध विरोधी पथकाने धडक मोहीम हाती घेतली असून बनावट कागदपत्रांच्या आधारे बेल्हे गावात आणखी एका बांगलादेशी घुसखोराला दहशतवादविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. हा घुसखोर डॉक्टर असून गेल्या चार दशकांपासून तो येथे राहत होता. त्याने जुन्नर, पारनेर, श्रीगोंदा, कल्याण, मुंबई आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात जागा व जमिनी खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सुकुमार पंचानन बिश्वास असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. तो 1990पासून बनावट कागदपत्रांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करीत होता. त्याच्याविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थेऊर येथे राहणाऱ्या हारूल पंचानन विश्वास या बांगलादेशी घुसखोराला दहशतवादविरोधी पथकाने नुकतेच जेरबंद केले. विश्वास हा होमिओपॅथी डॉक्टर म्हणून काम करत असल्याची बाब उघड झाली होती. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान सुकुमार बिश्वास याचे नाव समोर आले.
भावनगर टर्मिनल एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मृत्यू
भावनगर टर्मिनल एक्सप्रेसने केरळ ते राजस्थान असा प्रवास करणारा अजयकुमार मंगलराम कोली (29, रा. राजस्थान, सध्या रा. केरळ) याचा प्रवासादरम्यान मृत्यू झाला. खबर त्याचा भाऊ जितेंद्रकुमार मंगलराम कोली यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. अजयकुमार कोली हा भाऊ जितेंद्रकुमार कोली व गावाकडील काही लोकांसोबत केरळ येथे मार्बल बसवण्याचे मजुरीवर काम करायचा. अजयकुमार हा गेल्या आठ दिवसांपासून थंडी व तापाने आजारी होता. त्यामुळे त्याच्यावर केरळ येथे उपचार सुरू होते. जितेंद्र कुमार याने अजयकुमार याला कणकवली रेल्वे स्टेशन येथे रेल्वे सुरक्षा बलाच्या सहाय्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.




























































