पूर्णगड समुद्रात नौका बुडाली; दोन खलाशांना वाचवले
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रकिनारी आज सायंकाळी एक मच्छिमार नौका बुडाली. बुडणाऱ्या दोन खलाशांना कोस्टगार्डने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवले. पूर्णगड समुद्रात आज ‘माऊली’ नावाची मच्छिमार नौका बुडाली.नौकेत दोन खलाशी होते.त्यांना वाचविण्यासाठी मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाची नौका आणि मच्छिमारांची एक नौका गेली मात्र पाण्याला करंट असल्याने त्या पुढे जाऊ शकली नाही.त्यानंतर कोस्ट गार्डला माहिती देण्यात आली. कोस्टगार्डने हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोन्ही खलाशांना वाचवले.
मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा वर्धापन दिन
बेस्ट उपक्रम आणि अदानी इलेक्ट्रिसिटी, मुंबई या आस्थापनांमधील कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा 30 ऑगस्ट रोजी 52 वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युनियनचे सरचिटणीस विठ्ठल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत परळच्या शिरोडकर हॉल येथे सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. वर्धापन दिनानिमित्त बेस्ट आणि अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या वतीने कामगारांच्या शाळा-महाविद्यालयांतील मुला-मुलींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रे आणि शिष्यवृत्ती देऊन गौरव करण्यात येणार आहे. तसेच आनंदयात्री हा दिव्यांग कलाकारांचा कार्यक्रमही होणार आहे.
नगर पथविक्रेता समिती निवडणुकीसाठी 50 टक्के मतदान
मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेत्यांची एक शिखर समिती आणि सात परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (सात समित्या) एकूण आठ समित्यांच्या निवडणुकीसाठी आज शांततेत आणि सुरळीतपणे मतदान पार पडले. यात आज सरासरी 49.46 टक्के मतदान झाले. सर्वेच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, मतदान प्रक्रिया राबवून मतमोजणी आणि निकाल राखून ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, सर्व मतपेट्या स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून माननीय न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित कारवाई करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
अनिल नायर यांचे व्याख्यान
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट, मुंबई या संस्थेने 32 व्या नवल टाटा स्मृती व्याख्यानाचे आयोजन केलेय. याअंतर्गत अनिल नायर यांचे ‘एआय क्रांती आणि तिचे परिणाम’ यावर व्याख्यान होईल. अनिल नायर हे पोर्तुलन्स इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टन डीसीचे वरिष्ठ फेलो आणि थिंक स्ट्रीटचे संस्थापक आहेत. हा कार्यक्रम 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता, वालचंद हिराचंद हॉल, इंडियन मर्चंट चेंबर, चर्चगेट येथे होईल. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट, मुंबईचे संचालक सलील देसाई कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
सावन फेस्ट
गोरेगाव पश्चिम येथील केशव गोरे स्मारक सभागृहात 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबर या दिवशी तथास्तु सावन फेस्ट भरणार आहे. या महोत्सवात विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्स या महोत्सवाचे प्रायोजक आहेत.