उत्तर प्रदेशात अत्याचार करून दलित महिलेची हत्या, देहाचे तीन तुकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बनारस हिंदू विद्यापीठात एका विद्यार्थिनीशी झालेल्या अतिप्रसंगामुळे विद्यार्थी संतापले असतानाच, बांदा गावात एका 40 वर्षीय दलित महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एवढंच नव्हे तर या विकृताने हत्येनंतर तिच्या मृतदेहाचे तुकडेही केल्याचे आढळून आले आहे.  दरम्यान, पोलिसांनी घटनेचे वृत्त फेटाळले असून या महिलेचा मृत्यू चक्कीमध्ये अडकून झाल्याचे म्हटले आहे.या प्रकरणी राजकुमार शुक्ला, त्याचा भाऊ बौवा शुक्ला आणि रामकृष्ण शुक्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून तिघेही बेपत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले होते.

अखिलेश यादव यांची टीका

समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्या राज्य सरकारला धारेवर धरले आहे. एक्सवरील पोस्टमध्ये यादव म्हणाले की, बांदा येथील दलित महिलेवरील बलात्कार आणि हत्येची बातमी हृदय पिळवटून टाकणारी आहे. उत्तर प्रदेशातील महिला घाबरल्या आहेत आणि संतापल्याही आहेत. ही हत्या, बनारस विद्यापीठातील घटना या उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या तोंडावर चपराक आहेत आणि भाजपाच्या शून्य सहनशीलतेचा चेहरा उघडा पडला आहे.