लातूर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा व रेणा नदीवरील 24 बॅरेजेस कोरडेठाक

2050

लातूर जिल्ह्यातील मांजरा, तेरणा आणि रेणा या तीन नद्यांवर विविध गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी तसेच सिंचनाची समस्या सोडवण्यासाठी बॅरेजेसची निर्मिती करण्यात आली. मात्र पावसाअभावी सर्व 24 बॅरेजेस कोरडेठणठणीत आहेत. एक थेंबभरही पाणी या ठिकाणी उपलब्ध झालेले नाही.

लातूर जिल्ह्यात एकही मोठे धरण नाही. बीड जिल्ह्यातील धनेगाव स्थित मांजरा धरणातून आणि धाराशिव जिल्ह्यातील निम्न तेरणा धरणातून लातूर जिल्ह्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच औद्योगीक वसाहतीस लागणाऱ्या पाण्याची समस्या आणि सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या थोड्याफार प्रमाणात सुटते. सध्या या दोन्ही धरणांमध्ये मृतसाठ्यातील अत्यल्प पाणी उपलब्ध आहे. मोठा पाऊस नसल्यामुळे नद्यांना पाणी आलेच नाही.

पिण्याच्या पाण्याची समस्या आणि सिंचनाची समस्या दूर करण्यासाठी म्हणून मांजरा, तेरणा, रेणावरील बॅरेजची उभारणी करण्यात आली. मात्र एकाही बॅरेजेस पासून पिण्याच्या पाण्यासाठीची पाईपलाईन करण्यातच आली नाही. मांजरा नदीवर बांधण्यात आलेल्या 15 बॅरेजेसमध्ये तब्बल 65.05 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होऊ शकतो. तेरणा नदीवर बांधलेल्या 6 बॅरेजेसमधून 3.92 दशलक्षघन मिटर पाणी उपलब्ध होते. तर रेणा नदीवरील 3 बॅरेजेसमधून 0.89 दशलक्षघन मिटर पाणी उपलब्ध होते.

लातूर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण आजपर्यंत सुमारे 35 टक्के एवढेच झालेले आहे. मोठा पाऊस झालेलाच नाही त्यामुळे नदी, नाले, ओढे भरभरुन वाहिलेलेच नाहीत. मांजरा नदीवरील लासरा बॅरेज, बोरगाव अंजनपुर निम्न पातळी बंधारा, टाकळगाव देवळा बॅरेज, वांजरखेडा उच्च पातळी बंधारा, वांगदरी को.प. बंधारा, कारसा पोहरेगाव बॅरेज, नागझरी बॅरेज, साई बॅरेज, खुलगापूर बॅरेज, शिवणी बॅरेज, बिंदगीहाळ बॅरेज, डोंगरगाव बॅरेज, धनेगाव बॅरेज, होसूर बॅरेज, तावरजा नदीवरील भुसणी बॅरेज तेरणा नदीवरील राजेगाव ला.प.बॅरेज, किल्लारी क्र.२ ला.प. बॅरेज, मदनसुरी ला.प.बॅरेज, लिंबाळा ला.प.बॅरेज, गुंजरगा ला.प.बॅरेज, तगरखेडा ला.प. बॅरेज. रेणा नदीवरील रेणापूर ला.प.बॅरेज, खरोळा ला.प.बॅरेज आणि घनसरगांव ला.प. बॅरेज आज रोजी कोरडेठाक आहेत.

या बॅरेजेसची निर्मिती पिण्याच्या पाण्यासाठी व सिंचनासाठी म्हणूनच झाली परंतु कुठेच पिण्याचे पाणी या बॅरेजेसमधून उपलब्ध होत नाही. त्यामुळे आगामी काळात लातूर जिल्ह्यातील नागरीकांना भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या