
>> वर्णिका काकडे
‘दांग’ म्हणजेच ‘डांग’ याचा अर्थ अरण्य. गुजरात व महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील डांग या प्रदेशात बोलली जाणारी ही बोली भाषा डांग. कोणतीही बोली आपल्या समाजाचे गुणविशेष धारण करून जन्माला येते किंवा अस्तित्वात येते. म्हणूनच कोणत्याही बोलीचे स्वरूप पाहताना तिचा जन्मकाळ व अस्तित्वाकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
महाराष्ट्र आणि गुजरातचे द्वैभाषिक राज्य स्वतंत्रपणे इ.स. 1960 मध्ये अस्तित्वात आले, मात्र डांग हा दाट जंगलाचा प्रदेश गुजरात राज्यात समाविष्ट करण्यात आला. डांगचा अर्थ अरण्य असा होतो. या शब्दावरूनच या प्रदेशाला व या बोलीला डांग असे नाव पडले असावे. हा प्रदेश गुजरात व महाराष्ट्र या सीमावर्ती भागात पश्चिमेला आहे. या प्रदेशाच्या सीमा या बिलीमोरो, नाशिकमधील बागलाण, खानदेशचा साक्री भाग, नाशिक जिह्यातील कळवण व सुरगाणा या भागांनी व्यापल्या आहेत. त्यामुळे त्या त्या प्रादेशिक बोलीचा प्रभाव या बोलीवरही दिसून येतो. या प्रदेशात मुख्यत कोकणी, भिल्ल, चौधरी, कोळी, महादेव कोळी अशा आदिवासी लोकांची वस्ती आहे. त्यामुळे आदिवासी बोलींचा प्रभावही डांग बोलीवर जाणवतो
डांग बोलीच्या स्वरूपासंबंधी अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते ती मराठी भाषेची बोली आहे तर काहींच्या मते ती स्वतंत्र भाषा आहे. भाषा अभ्यासक ग्रिअर्सनच्या मते डांग बोली ही अहिराणी गुजरातीची पोटभाषा आहे.
डांग बोलीचे उच्चार मराठीशी मिळतेजुळते आहेत. यातील `च’ चे दोन्ही उच्चार मराठीप्रमाणेच आहेत. `ष’ व `श’ चा अभाव हे या बोलीचे मुख्य वैशिष्टय़. यात ताम्बोकु (तंबाकू), गणणे (मोजणे), मिहिना (महिना), पोळोस (पळस), लोसुण (लसूण), आकास (आकाश) असे उच्चार दिसून येतात. या बोलीत सर्वनामापैकी `हा’चे स्त्रीलिंगी `होई’ व `तो’चे नपुसकलिंग `त’ असे होते. तसेच अनेकवचनात प्रत्यय लागण्यापूर्वी `आहा-साहा’ असा बदल होतो. जसे आजासाहला (आजांना), मेहण्यासला (मेहुण्याना)
डांग बोलीत नातेविषयक शब्द गुजराती वळणाचे आढळतात. तर बराचसा शब्दसंग्रह मराठीशी जुळणारा आहे. पाठ (बकरी), भोवई (भुवई), साकु (अंडे), चोपा (एक माप), साहाळ (साळिंदर), टगारा (टोपली) चारा (गवत), अवस (अमावस्या) डोळफुकी (पाल), भेंगी (झोपडी) असे शब्द असलेली डांग बोली संपन्न आहे.

























































