
दापोली शहरात मृत अवस्थेत सापडलेल्या पाच कावळ्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या मृत कावळ्यांचा अहवाल पॉझिटिव आल्यानंतर प्रशासनाने दापोली शहराच्या आजूबाजूचा दहा किलोमीटरचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. ज्या भागामध्ये कावळ्यांचा मृत्यू झाला होता त्या परिसराला निर्जंतुक करण्यात येणार असून शहरातील आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे. तसेच बाहेरून येणारी अंडी व कोंबड्या यांना प्रतिबंध घालण्यात येणार आहे.
ज्यांच्या पोल्ट्री आहेत अशा लोकांनी त्या ठिकाणी घाण किंवा ओलावा राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आले आहेत. तसेच परिसरातील कोणत्याही ठिकाणी एखादी पक्षी मृतावस्थेत आढळला त्याला हात न लावता तात्काळ नगरपंचायतीला व पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात यावे, असे आव्हान दापोली नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे नगराध्यक्ष परवीन शेख उपनगराध्यक्ष प्रशांत कुसळकर यांनी कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिली. कुठेही एखादी पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्यास तात्काळ तो परिसर स्वच्छ करण्याच्या व लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लू या आजारामुळे घाबरून न जाता सगळ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दापोलीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी शहरातील बर्ड फ्लू ची साथ पसरू नये किंवा मृत पावलेल्या पक्षापासून शहरातील नागरिकांना कोणताही धोका होऊ नये, यासाठी एक विशेष थीम तयार केली असून हे टीम शहरातील साथी वर नियंत्रण मिळवण्यासाठी काम करणार आहे

































































