दाभिळ पांगारी, भोपण येथे विनापरवाना वाळूउपसा ! वाहतुकीचा रात्रीस खेळ चाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यात सध्या वाळू उपशाचा व वाहतूकीचा ‘रात्रीस खेळ चाले’ हा प्रकार सध्या सुरू झाला आहे. तालुक्यात दाभिळ पांगारी, भोपण खाडीत रात्रीच्या वेळेस व सुट्टीच्या दिवशी राजरोसपणे खाडीत सक्शन पंप व ड्रेझरद्वारे वाळू उपसा केला जात आहे.

खाडीतून वाळू आणण्यासाठी मोठी बार्ज असून त्या ठिकाणी क्रेन पण तैनात करण्यात आली आहे. जेटीही वाढविण्यात आली असून दिवस रात्र डंपर वाहतूक सुरू असते इतके सगळे होऊनही महसूल यंत्रणा याकडे दुर्लक्ष का करत आहे ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आमदार योगेशदादा कदम यांच्याकडेही काहींनी तक्रार केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर तालुक्यात खेड कर्जी, म्हाप्रळ येथीलही वाळू वाहतूक जोरात सुरू आहे.

या सगळया प्रकाराकडे महसुल अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी होऊ लागली आहे. या परिसरात कार्यरत असणारे महसूल विभागाचे सर्कल अधिकारी यांचे प्रकाराला अभय आहे का असा सवाल आता उपस्थित होत आहे. तसेच वाळूचे दरही अवाच्या सव्वा करण्यात आले असून माणुस बघून तब्बल 6 ते 7 हजार रुपये ब्रास या दराने वाळू विक्री होत आहे.

सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर हे दर गेल्याने साधे बांधकाम करणेही सामान्य माणसाला जिकरीचे झाले आहे. वाळू वाहतुकीचा रात्रीस खेळ चालू झाला असून चेक पोस्टवरील पोलिसांचाही या वाळू वाहतुकीला आशीर्वाद आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही डंपर तर अतिशय भरधाव वेगाने पळविले जातात अपघात घडल्यास याला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनीही या अनधिकृत वाळू उपशाकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होऊ लागली आहे.